पिंपरी चिंचवडमधील चिखली-कुदळवाडी टीपी स्कीम रद्द; प्रशासन झुकले, स्थानिकांच्या आंदोलनाला यश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील चिखली-कुदळवाडी परिसरातील प्रस्तावित टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीम रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) काल (बुधवार ता.14 मे) घेतला आहे. या निर्णयास स्थानिक शेतकरी, नागरिक आणि लघुउद्योजकांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला माघार घ्यावी लागली. या निर्णयामुळे चिखलीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी हा विजय ‘भूमिपुत्रांचा विजय’ म्हणून साजरा केला.
Video : आता थांबायचं नाही..पाणी मिळवणारच; संभाजीनगरमधून आदित्य ठाकरेंचा भाजपवर ‘हल्ला’
काय होती टीपी स्कीम?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली आणि चऱ्होली परिसरात एकूण सहा टीपी स्कीम्स लागू करण्याचा निर्णय 22 एप्रिल 2025 रोजी जाहीर केला होता. चिखली-कुदळवाडीतील 825 एकर जमिनीवर ही योजना राबवली जाणार होती. यामुळे स्थानिकांच्या जमिनी अधिग्रहित होण्याची आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याची भीती निर्माण झाली होती. रस्ते, उद्याने आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी जमीन आरक्षित करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र स्थानिकांनी विरोध केल्याने ही स्कीम रद्द करण्यात आली आहे.
‘नरकातील राऊत’ असं पुस्तकाचं नाव ठेवा, बावनकुळेंचा खोचक सल्ला
दरम्यान, महानगरपालिकेने या योजनेबाबत पारदर्शकता न बाळगल्याने स्थानिकांमध्ये संशय निर्माण झाला. योजनेचे नकाशे आणि तपशील पंधरा दिवसांनंतरही संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले नव्हते. याच काळात, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवरील कारवाईच्या नावाखाली चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आले होते. यामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवासी संतप्त झाले होते. याविरोधात चिखलीतील नागरिकांनी एकजुटीने आंदोलनाची तयारी सुरू केली आणि नोटिसांची होळी, कोपरा बैठका, निवेदने आणि मोठ्या सभा आयोजित करून स्थानिकांनी आपला विरोध तीव्र केला आणि याची परिणीती चिखलीतील स्कीम रद्द होण्यात झाली आहे.
टीपी स्कीम जाहीर ते रद्द संपुर्ण घटनाक्रम…
• 22 एप्रिल 2025: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली आणि चऱ्होलीसाठी सहा टीपी स्कीम्स जाहीर केल्या.
• 5 मे 2025: चिखलीत नोटिसांची होळी करून स्थानिकांनी विरोध दर्शवला.
• 6 मे 2025: कोपरा बैठका आणि स्थानिक नेते, अधिकाऱ्यांना निवेदने सादर.
• 10 मे 2025: चिखलीत शेतकरी आणि नागरिकांची मोठी बैठक.
• 11 मे 2025: भैरवनाथ मंदिरात सभा, तीव्र आंदोलनाचा इशारा.
• 15 मे 2025: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चिखली टीपी स्कीम रद्द.
दरम्यान, याप्रकरणी लँड माफियांचा हात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला त्यामुळे प्रशासन बॅकफूटवर गेलं. मात्र, चऱ्होलीतील पाच टीपी स्कीम्स अद्याप रद्द झालेल्या नाहीत. यामुळे तेथले नागरिकही आता आंदोलनाची तयारी करत आहेत. टीपी स्कीम रद्द झाली असली, तरी भविष्यात अशा योजना पुन्हा येऊ शकतात, याची जाणीव स्थानिकांना झाल्याने ते सावध झाले आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे लघुउद्योजकांना दिलासा मिळाला असून चिखली-कुदळवाडीतील लघुउद्योजकांना आपले व्यवसाय सुरक्षितेचा विश्वास मिळाला आहे. आता या निर्णयाचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्टया कोणत्या राजकीय नेत्यांवर वा पक्षावर शेकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.