घाबरू नका! काही घडलं तर बस थेट पोलीस स्टेशनला न्या; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पीएमपी’चा मोठा निर्णय

Pune News : राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातील घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. या अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. परंतु, आता महिलांच्या बाबतीत होणारे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाने या कामात पुढाकार घेतला आहे. पीएमपी बसमधून प्रवास करताना टवाळखोरांकडून महिला, विद्यार्थिनींना त्रास दिला गेल्यास बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जा. त्या टवाळखोरांबाबत तक्रार दाखल करा. या प्रकाराची माहिती पीएमपी अपघात विभाग आणि पोलीस नियंत्रण कक्षाला द्या अशा सूचना पीएमपी प्रशासनाने सर्व वाहक आणि चालकांना दिल्या आहेत.
Video: ..तर दत्ता गाडे मृतावस्थेत सापडला असता; पुणे पोलिसांचा ‘तो’ मानेवरील जखमांच्या उल्लेख काय?
बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूक विभागाने मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्व चालक, वाहक, गॅरेज सुपरवायझर, टाइमकीपर आणि आगार व्यवस्थापकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आता चालक वाहकांनी बसमध्ये काय प्रकार घडतात याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
काय आहेत सूचना
बस प्रवासादरम्यान महिलांना त्रास दिला जात असल्याचे आढळून आल्यास चालक आणि वाहकांना बस तातडीने पोलीस ठाण्यात घेऊन जावी. पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार नोंदवावी. बसमध्ये महिला प्रवाशांना टवाळखोरांकडून त्रास दिला जात असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला या प्रकाराची माहिती द्यावी. सर्व आगार व्यवस्थापकांनी आगारात आणि त्यांच्या अखत्यारीतील बस स्थानकांवर महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
तसेच स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती काय आहे याची नियमित पाहणी करावी. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तर तत्काळ दुरुस्त करून घ्यावेत. रात्रीच्या वेळी डेपोमध्ये किंवा एखाद्या वेळी रस्त्यावर बस पार्क करण्याची वेळ आलीच तर चालकांनी बसचा हँड ब्रेक लावावा. बसचे दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत का याची खात्री करावी.
स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड
बसमध्ये महिलांसाठी काही सीट राखीव असतात. पण बऱ्याचदा या सीटवर पुरुष बसलेले असतात. महिलांनी त्यांना तेथून उठायला सांगितल्यानंतर ते त्यांच्याशी वाद घालू लागतात. असे प्रसंग बसमध्ये घडत असतातच. महिलांकडून या प्रकाराची तक्रार चालक वाहकांकडे केली जाते परंतु, त्यांच्याशीही वाद अन् दमदाटीचे प्रकार घडत असतात. त्यामुळे अशा प्रसंगी तणावाची परिस्थिती निर्माण होते. आता पीएमपी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय बसमधील अशा सर्व प्रकारांना आळा घालेल असे सांगण्यात येत आहे.