गाझातील हल्ल्यात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू; जगभरात खळबळ
Vaibhav Kale News : इस्त्रायल हमास युद्धात (Israel Hamas War) भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव काळे यांचा (Vaibhav Kale) मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नल वैभव काळे संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून रफाहला जात असताना एक मिसाइल त्यांच्या वाहनावर आदळले यात त्यांचा मृत्यू झाला. इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धा सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. सन २०२२ मध्ये भारतीय सैन्यातून त्यांनी निवृत्ती घेतली होती. यानंतर दोनच महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षा विभागात सुरक्षा समन्वय अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
वैभव काळे यांनी भारतीय सैन्यात ११ जम्मू काश्मीर रायफल्स विभागात सेवा दिली. संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून राफाह येथील युरोपियन हॉस्पिटलमध्ये जात असताना ही घटना घडली. यात डीएसएस विभागाचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.
Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरावर केलेल्या हल्ल्यात 18 ठार
संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अँटोनियो गुटेरेस यांनी माजी कर्नल वैभव काळे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. महासचिवांचे उपप्रवक्त्यांद्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात गुटेरेस यांनी या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले. गाझा पट्टीत फक्त नागरिकच नाही तर मानवी मदत घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे गुटेरेस म्हणाले.
कर्नल वैभव काळे मुळचे नागपूरचे होते. एप्रिल २००४ मध्ये भारतीय लष्करी सेवेत रुजू झाले होते. संयुक्त राष्ट्रांत त्यांनी २००९ ते २०१० दरम्यान सेवा दिली होती. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बीए पदवी घेतली होती. त्यानंतर वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचीही पदवी त्यांनी घेतली होती. सन २०२२ मध्ये त्यांनी भारतीय सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतर ते कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार