पुण्यात टोळक्याची दहशत! लाठ्या काठ्या अन् रॉडने गाड्या फोडल्या; नागरिकांत घबराट

Pune News : पुण्यात काही दिवसांपूर्वी कोथरूड भागात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. यानंतरही शहरातील कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे नाव घेत नाही. आताही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूडसह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव शेरी भागातही टोळक्यांनी अनेक गाड्या फोडल्या आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी हातात कोयते, लाडकी बांबू आणि रॉड घेऊन गाड्या फोडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली परंतु ही घटना सातत्याने होताना दिसत आहेत. पुण्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे दोन दिवसांपूर्वी मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांना खडसावलं होतं. परंतु पोलिसांचा काही अंकुश गुन्हेगारांवर दिसत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात आढळल्या अळ्या, विद्यार्थ्यांमध्ये संताप
दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. यात काही तरुण सोसायटीत घरांच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या दुचाकी वाहने खाली पाडताना आणि हातातील काठ्यांच्या मदतीने वाहने फोडताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य काही जणांचा शोध घेतला जात आहे.