नव्यांना राम राम अन् निष्ठावंतांना थांब थांब; पुण्यात आणखी एका नेत्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

Pune Shivsena UBT : विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला गळती लागली आहे. एकामागोमाग एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जय महाराष्ट्र करत आहेत. पक्षबांधणी आणि आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसू लागले आहेत. आताही अशीच धक्का देणारी बातमी पुण्यातून आली आहे. शिवसेनेचे (उबाठा) शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी एक पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
कोकणात ठाकरेंना धक्का बसणार? बडा नेता शिंदेंच्या गळाला; उदय सामंतांनी प्रवेशाची थेट तारीखच सांगितली
ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पळसकर यांची पुढील रणनीतीही ठरली आहे. आपल्या काही कार्यकर्त्यांसह ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पळसकर जवळपास 22 वर्षे पक्षात काम करत होते. परंतु, आता मात्र त्यांना पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब अशी पक्षाची सध्याची अवस्था झाली आहे, असे पळसकर यांनी म्हटले आहे.
पळसकरांच्या पत्रात नेमकं काय?
एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सन 2002 मध्ये कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य झालो. शिवसेना परिवारासोबत जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत केली 23 वर्षे पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा लालसा न करता प्रामाणिकपणे पार पाडत आलो. साम-दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संवैधानिक पदांवर गेले तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल झाले. तुरुंगवारी झाली.
आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळात निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात राजकीय महत्त्वकांक्षा मनात ठेवून काहीजण पक्षाची पदे उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत. अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब ही संकल्पना काही नेते राबवीत आहेत. ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे तूर्तास इतकेच, असे पळसकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
सारखीच बडबड..राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल