‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; BCCI स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रा. क्रिकेट सेटअप सुरू
जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असे पुनीत बालन म्हणाले.
पुणे : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन (Punit Balan) यांनी व्यक्त केला. ही अकॅडमी पुणे आणि महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत ठरणार असून, क्रिकेटमधील करिअर करण्याची इच्छाशक्ती असलेल्या मुला-मुलींसाठी ही एक ऐतिहासिक संधी मानली जात आहे.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून नेहमीच विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भारतीयांमध्ये क्रिकेट खेळांमधील प्रेम लक्षात घेऊन आता क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले, ‘‘या अकॅडमीसाठी दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. सिंहगड कॉलेजच्या वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा त्यात समावेश आहे. या अकॅडमीतील सर्व सुविधा बीसीसीआय मानकांनुसार असणार असून पुढील सिझनपासून बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजन येथे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआय प्रशिक्षित प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून प्रवेश सुरू होणार असून दि. १५ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोचिंग सुरू होणार आहे. ही प्रोफेशनल अकॅडमी असल्यामुळे प्रवेश मर्यादित असणार आहेत.’’
सोयी-सुविधायुक्त मैदान
या अकॅडमीमध्ये पावसाळ्यातही सरावात कोणताही खंड पडणार नाही तर तो सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक मैदानावर इनडोअर ३ विकेट्सची सुविधा असणार आहे. त्यामुळे वर्षभर प्रशिक्षण सुरु राहिल. दोन्ही मैदानांवर खेळाडूंसाठी होस्टेल सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे बाहेरगावच्या खेळाडूंनाही सहज प्रशिक्षण घेता येणार आहे. याशिवाय खेळाडुंसाठी व्यायाम शाळा, जलतरण तलाव, फिटनेस कोचिंग अशा सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. या अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांगीण फिटनेस आणि स्पोर्ट्स कंडिशनिंगचीही सुविधा मिळणार आहे.
महिलांसाठी विशेष बॅचेस
महिला क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र बॅचेसची व्यवस्था असून, मुलींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाईल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. अकॅडमीतील खेळाडूंना पीबीजी ज्युडीसियल क्रिकेट क्लब तर्फे विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढण्यास निश्चितच मदत होईल
पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणी खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी केली आहे. आमच्या सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचे सर्वेसर्वा पुनीत बालन यांनी व्यक्त केला आहे.
