“दोघांत पैशांचा वाद, शरीरसंबंधही दोघांच्या संमतीनेच..”, आरोपी गाडेच्या वकिलांचा धक्कादायक दावा

Dattatray Gade : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गाडेला अटक केल्यानंतर पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. येथे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गाडेला पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बलात्कार झालाच नाही. जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने झाले असा दावा वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
दत्तात्रय गाडे आणि संबंधित तरुणी एकमेकांना ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर ही बाब लक्षात येईल. बसमधून दोघे एकत्रच उतरले होते. बसमधून उतरुन कुठे गेले होते याची माहिती घेण्यात यावी. दोघांत पैशांचा वादही झाला होता. या घटनेनंतर दत्ता गाडे कुठे पळून गेला नाही तर त्याच्या गावी गेला. गावात पोलीस बंदोबस्त असल्याने तो दडून बसला होता अशी माहिती दत्ता गाडेच्या वकिलांनी दिली.
मोठी बातमी! स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी
प्रकरण नेमकं काय?
मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?
तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरू केला. शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून दत्तात्रय गाडेला ताब्यात घेण्यात आले. यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.