तनिषा भिसे यांचा मृत्यू एक ‘सिस्टम अलर्ट’; सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांना आली जाग

  • Written By: Published:
तनिषा भिसे यांचा मृत्यू एक ‘सिस्टम अलर्ट’; सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांना आली जाग

Sunetra Pawar X Post On Pune Tanisha Bhise Death : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वातावरण तापले असून, दिनानाथ मंगेशकर रूग्णालयासह डॉक्टरांवर कोठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर अनेक संघटना आणि विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरले आहेत. परंतु, अद्याप या गंभीर घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या सर्वांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) एक्सवर पोस्ट करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. यात त्यांनी तनिषा भिसे यांचा मृत्यू हा एक सिस्टम अलर्ट असल्याचे म्हटले आहे. सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांची घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवारांची पोस्ट नेमकी काय?

तनिषा भिसे यांचा मृत्यू केवळ एक दुःखद घटना नाही तर तो एक ‘सिस्टम अलर्ट’ आहे. खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा घालणे आज अत्यावश्यक आहे, नाहीतर ही असंवेदनशीलता उद्या आणखी कितीतरी तनिषा भिसेंचा बळी घेईल. म्हणूनच मी राज्य शासनाकडे विनंती करते की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशील आणि अमानवी वागणुकीची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत यासाठी खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवावं आणि आपत्कालीन परिस्थितीत उपचारास प्राधान्य देणं राज्य शासनाने बंधनकारक करावं अशी विनंती सुनेत्रा पवारांनी केली आहे.

तनिषा भिसेंच्या मृत्युवर काय म्हणाले अजित पवार?

“पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीच्या झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती.”

दीनानाथ रूग्णालयाला अवघे 1 रूपये भाडे, तरीही 10 लाखांचा हव्यास; RTI कार्यकर्ते कुभारांनी काढला कच्चाचिठ्ठा

आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन

पुण्यातील घटना मनाला सुन्न करणारी आहे. घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यातून येणाऱ्या अहवालानुसार संबंधित रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत केली आहे. शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ अशा रुग्णालयांना मिळत असतो. त्यामुळे अशी पैशांची मागणी संबंधित रुग्णालयाला करता येऊ शकते का? याचीही चौकशी होईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.

सरकार रुग्णालयावर कारवाई करेल; बावनकुळेंचा शब्द 

पुण्यातील रुग्णालय प्रकरणासंदर्भातील आंदोलनं पाहता हा नागरिकांचा अधिकार आहे असं म्हणत सरकार रुग्णालयावर कारवाई करेल असा शब्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ‘मुजोरी करणे ही मुघलशाही आहे. नेमकी काय चूक झाली आहे सरकार तपासणार आहे’, असं म्हणत सर्व सामान्य नागरिकांचा उपचार घेणे अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, कुणालाही या प्रकरणात माफ करणार नाहीत. कडक कारवाई करणार आहोत असं म्हणत त्यांनी या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

तनिषा भिसे मृ्त्यू प्रकरणाची मनपाकडून दखल; मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीचा मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप

दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती. रूग्ण गंभीर असताना देखील अॅडमिट करून घेतलं नाही, असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय. त्याचबरोबर या पिडीतेच्या नातेवाईकांनी देखील यावर पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीला जेव्हा रक्तश्राव होऊ लागला तेव्हा पूर्वी दिलेलीच औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला. नाहीतर पूर्ण दहा लाख रुपये भरा तेव्हाच उपचार सुरू होतील. अशा स्पष्ट सूचना डॉक्टरांनी सर्व स्टाफ ला दिल्या होत्या. मग आम्ही 3 लाख घेऊन बिलिंग विभागात गेलो. मात्र पुर्ण पैसे नसल्यास रूग्णाला दाखल करणार नाही . असं मिनाक्षी गोसावी यांनी सांगितलं. तुम्हाला परवडत नसल्यास ससूनला जा असा विचित्र सल्ला आम्हाला गर्भवती अत्यंत नाजून अवस्थेत असताना दिला गेला. हा सर्व प्रकार गर्भवतीने पाहिल्याने तिने त्याचा धसका घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. असा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

https://twitter.com/SunetraA_Pawar/status/1908060083520405877

follow us
  • fb
  • instagram
  • youtube