ती बातमीच खोटी!मुयरी जगतापच्या दाव्यांचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

That news is false! State Women’s Commission refutes Muyri Jagtap’s claims after Vaishnavi Hagwane case : सासरच्या लोकांकडून होणारा छळ आणि सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहितेने आत्महत्या केली. दुसरीकडे आता हगवणे कुटुंबियांचे कारनामे समोर येत आहे. हगवणे कुटुंबाची मोठी सुन मयुरी जगताप यांनी देखील हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे. तसेच आपण याबाबत महिला आयोगाकडे तक्रार दिली असून त्यावर कारवाई झाली नसल्याचं तिचं म्हणणं होतं. मात्र या वृत्ताचे खंडण केले आहे.
यावर महिला आयोगाने म्हटलं आहे की, वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७ नोव्हेंबर २०२४ रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन १९ मे २०२५ रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही.
शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहास जपण्याचे काम करु, खासदार लंकेंचे प्रतिपादन
पौंड पोलिसांनी गुन्हा रजि नं. ४८५/२०२४ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ७४,११५,३५२,२९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने ३१ जानेवारी २०२५ रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. श्रीमती मयुरी जगताप यांच्या प्रकरणी २२ मे २०२५ रोजी १०२/२०२५ अन्वये मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.