Vasant More यांची मध्यस्थी : अन् एका तासात प्रकरण मिटले…
Vasant More : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कात्रज भागातील अतिश जाधव आणि डॉ. अविनाश फाटक यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. प्रकरण अगदी न्यायालयात गेले. पण वाद काही थांबत नव्हता. सोशल मीडियावर देखील या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्याने बदनामी सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या भागातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी जाधव आणि डॉ. फाटक यांची भेट घेतली. तसेच सामोपचाराने दोघांमध्ये एकमत घडवत हे प्रकरण अगदी एका तासात मिटवले.
‘भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर, असे म्हणत पुणे शहरात भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळलेल्या तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याने लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. बिबवेवाडी येथील डॉ. अविनाश फाटक (वय ७२) आणि माधुरी फाटक (वय ६७) या वृद्ध दाम्पत्याने गांधीवादी मार्गाने उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनात अन्य ८ ते १० नागरिकांनी पाठिंबा देत साथ दिली.
बिबवेवाडी येथील फाटक दाम्पत्याने सदानंद सोसायटी परिसरातील ‘सरस्वती’ हा बंगला अतिष जाधव या व्यक्तीला ‘किडझी’ या नर्सरी स्कुलसाठी पाच वर्षांच्या भाडेकरारावर दिला होता. मात्र, गेल्या साडेतीन वर्षांपासून अतिश जाधव हे डॉ. फाटक यांना भाडे देत नव्हता. तसेच या बंगल्यात अन्य भाडेकरू ठेवून अन्य व्यवसाय अनधिकृतपणे करत होते. डॉ. फाटक हे वारंवार जाधव यांना फोन करून भाड्या संदर्भात तसेच बंगला खाली करण्यासंदर्भात विचारत होते. मात्र, त्यांना जाधव हा कोणताही प्रतिसाद न देता टाळाटाळ करत होता. शेवटी कंटाळून डॉ. फाटक यांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु, तिथे कोणताही निर्णय होत नव्हता. केवळ हेलपाटे सुरू असल्याने कंटाळून त्यांनी गांधीवादी मार्गाने उपोषण सुरू केले होते.
(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube
डॉ. फाटक दाम्पत्याचे उपोषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे जाधव यांची बदनामी होऊ लागली. या उपोषणाच्या बातम्या टीव्हीवर देखील येऊ लागल्या. त्या पाहून या परिसरातील स्थानिक मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मध्यस्थी केली. तसेच अतिश जाधव आणि डॉ. फाटक दाम्पत्य यांच्यामध्ये एक तासभर चर्चा करून सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्यासाठी तडजोड केली.
यामध्ये डॉ. फाटक दाम्पत्याने गेल्या तीन-साडेतीन वर्षातील अतिश जाधव यांच्याकडून येणारे दहा लाखांहून अधिकचे भाडे माफ केले आहे. तर अतिश जाधव याने येत्या एक महिन्याच्या आत हा बंगला खाली करण्याचे आश्वासन वसंत मोरे यांच्या उपस्थितीत डॉ. फाटक दाम्पत्याला दिले आहे.