कसब्यात पुन्हा रासने तर खडकवासला आणि कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमानांना संधी…
पुणे : भाजपकडून (BJP) 22 उमेदवारांची आज (ता. 26 ऑक्टोबर) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील भाजपच्या वाट्याला असलेल्या कसबापेठ (Kasaba Path), पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या मतदारसंघात अनुक्रमे हेमंत रासने (Hemant Rasane), सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
IND vs NZ : टीम इंडियाला धक्का अन् न्यूझीलंडने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
याआधी पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघातून चंद्रकांत पाटील सिद्धार्थ शिरोळे आणि माधुरी मिसाळ यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आज घोषित करण्यात आलेल्या जागेवरील सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. आज अखेर भाजप नेतृत्वाने हा सस्पेन्स संपवला असून हेमंत रासने यांना पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा कसब्यातून संधी दिली आहे. तर खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांना पुन्हा संधी दिली आहे.
मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, गोपीचंद पडळकर रिंगणात
कसब्यात होती चुरस
आज घोषित करण्यात आलेल्या नावांमध्ये कसब्यातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रासने यांच्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र तरीदेखील त्यांचा सुमारे 11 हजार मताच्या फरकाने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. यामुळे भाजप यावेळी नवा चेहरा कसब्यातून उमेदवार देईल, असा कयास लावला जात होता. मात्र भाजपने विद्यमान आमदार आणि पोटनिवडणूक लढलेले हेमंत रासने यांनाच संधी दिली आहे.
ब्राह्मण फॅक्टर महत्त्वाचा
कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर हेमंत रासने यांना कसब्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी देखील ब्राह्मण उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्याचाच फटका रासने यांना पोटनिवडणुकीत बसला, असे गणित अनेक राजकीय जाणकार मांडतात. नेमकं हेच लक्षात घेत भाजप नेतृत्व यावेळेस कसबा पेठ मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार देईल, यामध्ये स्व. मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक, स्व. गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट किंवा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यापैकी एकाला संधी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र भाजप नेतृत्वाने पोटनिवडणुकीपासून मतदारसंघामध्ये कामाला लागलेले हेमंत रासने यांच्यावर विश्वास टाकला आहे.
दरम्यान, आधी जाहीर केलेल्या यादीमध्ये पुण्यातील तीन मतदारसंघातचे उमेदवार जाहीर करण्यात आल्याने उर्वरित कसबा पेठ, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये उलट फेर होईल, असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. मात्र विद्यमान आमदारांना संधी देत भाजपने आपल्या आमदारांवर विश्वास दाखवला आहे.
खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या ठिकाणी भाजपकडून अनेक इच्छुक आहेत. आता यादी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेल्या नेत्यांकडून बंडखोरी होणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.