पुण्याच्या प्रसिद्ध बिल्डरवर गुन्हा… जमीन मालकाच्या फसवणुकीसाठी लढवले असे डोके…
VTP2
VTP Builde Fraud Case : खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्हिटीपी अर्बनचे प्रमुख बांधकाम व्यावसायिक भूषण पारलेशा, निलेश पारलेशा तसेच एस बँकेचे कार्यकारी संचालक, जनता बँकेचे संजय लेले, व्यवस्थापक नरेश मित्तल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे हे करत आहेत.
खोटी कागदपत्रे व खोट्या सह्या करून बँकेत बनावट खाते उघडून व्हिटीपी अर्बन प्रोजेक्टच्या भागीदारांनी हडपसर येथील बांधकाम व्यावसायिकाची दोन कोटी चोपन्न लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्हिटीपी अर्बन प्रोजेक्टच्या तीन भागीदारांसह बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०१६ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे.
व्हिटीपी अर्बनचे प्रमुखांनी हडपसर येथील बांधकाम प्रकल्पात कोट्यावधींची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुल रामदास तुपे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्हिटीपी अर्बनचे भूषण पारलेशा, निलेश पारलेशा, विलास पारलेशा यांच्यासह एस बँकेचे कार्यकारी संचालक रणजीत गिल, जनता बँकेचे संजय मुकुंद लेले, मॅनेजर नरेश मित्तल यांच्या विरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ४०३,४०६, ४०९, ४१७,४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ४७७ अ ५०६, १२० या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
तक्रारदार राहुल तुपे यांनी हडपसर येथील स्वमालकीची जमीन व्हिटीपीला विकसन करण्यासाठी दिली होती. तुपे यांच्या जमिनीवर अकरा व बारा मजली अशा दोन इमारती बांधून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जॉइंट व्हेंचर अग्रीमेंट करण्यात आले होते. त्यानंतर तुपे यांच्या मिळकतीवर व्हिटीपीने अर्बन बॅलन्स या नावाने प्रोजेक्ट चालू केला. तेव्हा अग्रीमेंटप्रमाणे त्यामध्ये विक्री झालेल्या सदनिकांचे पैसे जॉइंट अकाऊंट उघडून तेथे जमा करण्याचे ठरले होते. त्यानुसार जनता सहकारी बँकेच्या भवानी पेठ येथील शाखेत व्हिटीपी अर्बन प्रोजेक्ट पुणे एलएलपी-अर्बन बॅलन्स नावाने कलेक्शन खाते तुपे व पारलेशा यांच्या संमतीने उघडण्यात आले होते.
Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला! – Letsupp
सुरवातीला बुकिंग होणाऱ्या सदनिकांचे सर्व पैसे या खात्यावर जमा होत होते. मात्र,काही महिन्यातच व्हिटीपीच्या भागीदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकत्रित खात्याचे स्वतंत्र चेकबुक घेतले आणि एकत्रित खात्यावर येणारे पैसे हे वैयक्तिक खात्यावर जमा करू लागले. दरम्यान एकत्रित खात्यावर ठरलेल्या हिस्याचे पैसे जमा होत नसल्याचे राहुल तुपे यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी जनता सहकारी बँकेच्या भवानी पेठ येथील शाखेत जावून चौकशी केली असता झालेली फसवणूक तुपे यांच्या लक्षात आली. त्यानंतर काही दिवसांतच असे निदर्शनास आले की जनता सहकारी बँकेत एकत्रित खाते चालू असतानाच येस बँकेच्या कल्याणी नगर येथील शाखेत व्हिटीपीच्या भागीदारांनी स्वतंत्र वैयक्तिक नवीन खाते सुरू करून त्यात सदनिकाधारकांचे येणारे पैसे जमा केले. याशिवाय या प्रोजेक्ट मधील दहा सदनिका परस्पर स्वताच्या नावावर करून बँकेला तारण ठेवल्या. या दोनही बँकेत व्हिटीपी अर्बनच्या भागीदार यांनी राहुल तुपे यांची खोटी कागदपत्रे व सह्या करून दोन कोटी चोपन्न लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस अधिकचा तपास करत आहे.