फक्त 0.01 मीटरने विजेतेपद हुकलं, ‘या’ दुखापतीने नीरज हैराण; हरल्यानंतरही मिळाले लाखो रुपये..
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पहिल्यांदाच (Neeraj Chopra) अॅक्शन मोडमध्ये दिसला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची (Gold Medal) त्याची संधी हुकली होती. ही कसर डायमंड लीगमध्ये (Diamond League) भरून काढली जाईल असे अपेक्षित होते. परंतु, येथेही नीरज अपयशी ठरला. फक्त एक सेंटीमीटरच्या फरकाने नीरज चोप्राला विजेतेपदापासून वंचित ठेवले.
‘या’ दुखापतीने नीरज होतोय पराभूत
या स्पर्धेतील फायनल राउंडमध्ये नीरज चोप्राने 87.86 मीटर भालाफेक करत दुसऱ्या क्रमांक मिळवला. तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक मिळवला. नीरज चोप्रा फक्त 0.01 मीटरच्या फरकाने चॅम्पियन होता होता राहिला. या अपयशामागं नीरजची दुखापत असल्याचंही सांगतिलं जात आहे.
Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
या सीजनमध्ये नीरज चोप्राला कंबरदुखीने चांगलेच हैराण केले. एडक्टर निगल या व्याधीने नीरजल चांगलाच त्रास दिला. याच दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला 89.45 मीटर थ्रोवरच समाधान मानावं लागलं. नीरजच्या कुटुंबियांनीही अनेकदा या दुखापतीचा उल्लेख केला होता. या दुखापतीमुळे नीरजला त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करता आले नाही. आता सीजन संपल्यानंतर नीरज शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नीरजच्या खात्यात किती पैसे आले?
चॅम्पियन ठरलेल्या अँडरसन पीटर्सला डायमंड ट्रॉफीसह 30 हजार अमेरिकी डॉलर बक्षीस रुपात मिळाले. भारतीय चलनात ही रक्कम 25.16 लाख रुपये इतकी होते. इतकंच नाही तर पीटर्सने अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. या स्पर्धेत नीरद दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तरीही त्याला 12 हजार अमेरिकी डॉलर (10.06 लाख रुपये) मिळाले.
डायमंड लीग स्पर्धेत चॅम्पियनशीपसाठी नीरजने भरपूर प्रयत्न केले. पहिल्या राउंडमध्ये 86.82 मीटर थ्रो करत नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसऱ्या राउंडमध्ये 83.49 मीटर, तिसऱ्या राउंडमध्ये 87.86 मीटरवर भाला फेकला. तरीही नीरज दुसऱ्या क्रमांकावरच राहिला. चौथ्या राउंडमध्ये मात्र त्याचा थ्रो निराशाजनक राहिला. पाचव्या राउंडमध्ये संधी होती पण पहिला नंबर काही मिळालाच नाही. या राउंडमध्ये त्याचा थ्रो 83.30 मीटर इतकाच राहिला. शेवटच्या राउंडमध्ये नीरज चोप्राने 86.46 मीटर थ्रो केला. मागील वर्षातील डायमंड लीग स्पर्धेतही नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. आताही हीच पुनरावृत्ती त्याने केली.
डायमंड लीग फायनल खेळणारा पहिला भारतीय ट्रॅक खेळाडू; अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी