अटीतटीच्या सामन्यात टीम इंडिया विजयी; आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव
IND vs SA Match Report : टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी (IND vs SA) पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाने (Team India) विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वीस ओव्हर्समध्ये 219 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संध 208 धावाच करू शकला. या विजयानंतर चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉनसेनने 54 धावा केल्या. तरी देखील त्याला टीमचा पराभव रोखता आला नाही. त्याने चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. याव्यतिरिक्त हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावा केल्या.
भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 27 स्कोअर असताना पडली. रेजा हेनरिक्सने 13 चेंडूत 21 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करमने 18 चेंडूत 29 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 12 चेंडूत 12 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 41 धावा केल्या. अर्शदीप सिंहने त्याला बाद केले.
IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी
भारतीय गोलंदाजांनी चिवट गोलंदाजी केली. अर्शदीप सिंहने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देत तीन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 2 तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तिलक अन् अभिषेकची खेळी
याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 219 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. तर सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने 25 चेंडूत 50 धावा केल्या.