आशिया कप संकटात, रद्द होण्याची भीती; भारत अन् श्रीलंकेच्या ‘त्या’ निर्णयाने खळबळ!

Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात (Asia Cup 2025) आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्या एका निर्णयाने आशिया कप रद्द होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 24 जुलै या दिवशी बांग्लादेशची राजधानी ढाका शहरात आशियाई क्रिकेट परिषदेची एक बैठक होणार आहे. बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या बैठकीत हजर राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
टूर्नामेंटसाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. याच दरम्यान टेलिकॉम स्पोर्ट एशियाच्या एक रिपोर्टने खळबळ उडवून दिली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की 24 जुलै रोजी ढाकात होणाऱ्या एसीसीच्या बैठकीत सहभागी होण्यास भारत आणि श्रीलंकेने नकार दिला आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध (India Bangladesh Relation) सध्या ताणले गेले आहेत. मागील वर्षी बांग्लादेशात सत्तांतर झाले. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार उलथून टाकण्यात आले. तेव्हापासून देशात अराजकतेची स्थिती आहे. येथील अंतरिम सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहे. त्याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. टीम इंडियाचा ऑगस्टमधील बांग्लादेश दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्यामागे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतील व्यस्ततेचे कारण बीसीसीआयने दिले असले तरी खरे कारण दोन्ही देशांतील तणाव हेच असल्याचे सांगितले जात आहे.
भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चौथ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकाही जिंकली
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की या बैठकीत भारत आणि श्रीलंका सहभागी होणार नाहीत. तरीदेखील ही बैठक नियोजित वेळी होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टेलिकॉम एशिया स्पोर्टशी बोलताना सांगितले की आम्ही सर्व सदस्य देशांना आवश्यक नियोजन करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर एखादा सदस्य बैठकीसाठी उपस्थित राहू शकत नसेल तर तो ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी होऊ शकतो. बैठक ढाकात होणार आहे.
आशिया कप कुठे होणार
आशिया कप टी 20 प्रकारात आयोजित केला जाणार आहे. भारत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. परंतु, यातील काही सामने अन्य देशांत होतील. पाकिस्तानचा संघ त्यांचे सामने भारताबाहेर खेळणार आहे. हे सामने कदाचित दुबईत होऊ शकतात. यानंतर एसीसीने बीसीसीआयला पत्र लिहून विचारले आहे की तुम्ही अजूनही या स्पर्धेचे आयोजन करू इच्छित आहात का. खरंतर अशाही बातम्या येत आहे की संपूर्ण स्पर्धाच युएईमध्ये शिफ्ट होऊ शकते.
बीसीसीआयची भूमिका नक्की काय
टीव्ही9 च्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे की बोर्डाने एसीसीला आम्ही आमचे अधिकारी ढाका येथील बैठकीसाठी पाठवणार नाही असे स्पष्टपणे कळवले आहे. रिपोर्टनुसार जर आशिया कप जर स्थगित झाला तर या दरम्यान इंग्लंड आणि श्रीलंकेने भारताविरुद्ध क्रिकेट मालिका आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सामना गमावला, मालिका गमावली अन् गोलंदाजही चुकला; आयसीसीने दिली मोठी शिक्षा, काय घडलं?