अमेरिकेत वर्ल्डकप भरवला मोठा पण, मिळेना पैसा; प्रेक्षकांच्या ‘दुष्काळा’ने ICC हैराण

अमेरिकेत वर्ल्डकप भरवला मोठा पण, मिळेना पैसा; प्रेक्षकांच्या ‘दुष्काळा’ने ICC हैराण

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. यंदा ही स्पर्धा (T20 World Cup) अमेरिका आणि वेस्ट इंडीज य दोन देशांत खेळवली जात आहे. या स्पर्धेत आयसीसीसमोर नवीनच संकट उभं राहिलं आहे. ज्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील वर्षी वन डे विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आल्या होत्या. क्रिकेटप्रेमी भारतात काही सामने सोडले तर जवळपास सर्वच सामन्यात स्टेडियम गर्दीने तुडुंब भरले जात होते. तशी परिस्थिती अमेरिकेत दिसत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारत आयर्लंड यांच्यातील सामना रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी कुणीच प्रेक्षक आला नाही.

न्यूयॉर्क मधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात स्टेडियम बरेचसे रिकामे होते. याचं महत्त्वाचं कारणही समोर आलं आहे. भारताच्या सामन्यांसाठी आयसीसीने तिकीट दरात वाढ केली आहे तसेच परिषदेने तयार केलेला मार्केटिंग प्लॅनही फारसा परिणामकारक नाही. आतापर्यंत या मालिकेत जितके सामने झाले आहेत त्यापैकी एकाही सामन्यात स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरले नाही.

अमेरिकेने इतिहास रचला! सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; मुंबईचा नेत्रावळकर चमकला

स्टेडियममधील प्रीमियम नॉर्थ आणि साऊथ स्टँडच्या तिकिटांची किंमत तब्बल एक हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच 83 हजार रुपये होती. इतक्या जास्त रकमेची तिकिटे खरेदी करण्यासाठी कुणीच नव्हते. ब्रॉडकास्टर सुद्धा हा प्रसंग परीक्षेचा होता. कारण स्क्रीनच्या चारही बाजूंनी स्टेडियम रिकामेच दिसत होते. फक्त काही ठिकाणी भारतीय चाहते दिसत होते.

भारतात मागील वर्षात विश्वचषक स्पर्धा झाली. त्यावेळी काही मोजकेच सामने सोडले तर जवळपास प्रत्येक सामन्यात स्टेडियम खचाखच भरलेले असायचे. चाहत्यांनी येथे येण्याचंही एक मोठं रेकॉर्ड केलं होत. पण अमेरिकेतील स्पर्धेत प्रेक्षकांचा दुष्काळ ही मोठी समस्या आयसीसी समोर उभी राहिली आहे. भारत आयर्लंड सामना ज्या मैदानावर झाला त्या मैदानाची प्रेक्षकांची क्षमता 34 हजारांची आहे. प्रत्यक्षात मात्र 20 हजारच प्रेक्षक सामन्यासाठी उपस्थित होते.

जे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते त्यांनी स्टेडियम मधील सुविधांच्या अभावाचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली. तिकिटासाठी जास्त पैसे घेतले मात्र तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत असे प्रेक्षकांनी सांगितले. आता याच मैदानावर रविवारी भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी भरलेले असावे अशी आयसीसीचा इच्छा आहे. परंतु इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील याची खात्री देता येत नाही. कारण न्यूयॉर्क मधील खेळपट्ट्या खराब आहेत. ज्यामुळे आधीच्या दोन सामन्यात संघांना शंभर धावा सुद्धा करता आलेल्या नाहीत.

भारताची विजयी सलामी! पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय

दुसरे कारण म्हणजे तिकीट दरात झालेली वाढ. यामुळे अजूनही सामन्याची संपूर्ण तिकीट विक्री झालेली नाही. डायमंड क्लब सीट तिकिटाची किंमत तब्बल आठ लाख रुपये आहे. कॉर्नर क्लब सीट तिकिटाची किंमत 2.2 लाख रुपये आणि प्रीमियम क्लब लाउंज सीट तिकिटाची किंमत दोन लाख रुपये आहे. या तिन्ही ठिकाणची अनेक तिकिटे अजून शिल्लक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेता आयसीसीने एक्स्ट्रा तिकिटांचे नियोजन केले आहे. अशा परिस्थितीत जर स्टेडियम रिकामेच राहिले तर अमेरिकेत वर्ल्ड कप आयोजित करण्याचा निर्णय चुकला असेच म्हणावे लागेल.

टीम इंडियाच्या चार ग्रुप सामन्यांपैकी तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. या सामन्यांसाठी गर्दी जमवण्यासाठी आयसीसीला मोठी कसरत करावी लागत आहे. याआधीच्या विश्वचषका दरम्यान अशी समस्या कधीच निर्माण झाली नव्हती. मार्केटचा कोणताच विचार न करता अमेरिकेत वर्ल्डकप घेण्याच्या आयसीसीच्या या निर्णयावर आता टीका सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना होणाऱ्या गर्दीवर बरेच काही अवलंबून आहे असे तज्ञांचे मत आहे.

आता या सामन्यासाठी गर्दी जमा करण्यास जर आयसीसीला अपयश आले तर ही मोठी नामुष्कीची गोष्ट असेल. अमेरिकेतील टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचे यश भारत पाकिस्तान सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्यासाठी आयसीसीकडे आता फारसा वेळही राहिलेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज