तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत तिलक वर्माचा पराक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद 338 धावा
Tilak Varma : टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दोन गडी राखून विजय मिळवला. काल चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात (Tilak Varma ) यजमान संघाला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य होते, जे शेवटच्या षटकात पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
हा सामना भारतीय संघासाठी अजिबात सोपा नव्हता. कोलकाता टी-20 मध्ये भारतीय संघाने विकेटचा सहज पाठलाग केला होता, पण चेपॉकमधील परिस्थिती वेगळी होती. भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. एके काळी भारतीय संघाच्या 5 विकेट 78 धावांवर पडल्या होत्या, अशा स्थितीत खेळ हातातून निसटल्याचे दिसत होते, पण तिलकचा इरादा स्पष्ट होता. या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ तिलकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरवला. तिलक वर्माने 55 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या.
मागील चार सामन्यांपासून तिलक नाबाद
कालच्या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 72 धावा करताना एक अनोखा योगायोग झाला. त्याच्या जर्सीचा सुद्धा नंबर 72 आहे. हा योगायोग साधला असतानाच मागील चार डावात तिलक वर्मा नाबाद असून त्याने 338 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्येही त्याने नाबाद 19 धावांची खेळी केली होती. साऊथ आफ्रिका दौऱ्यातही त्याने सलग दोन नाबाद शतके ठोकली होती. दरम्यान, तिलक वर्माने कालच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत सहाव्या विकेटसाठी 38 धावांची मॅच टर्निंग पार्टनरशीप केली. मात्र, सुंदर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाला, त्यामुळे सामना खूपच रोमांचक झाला.