live now
Ayodhya : राम वाद नव्हे तर, समाधान आहे! फक्त विचार बदलण्याची गरज : PM मोदी
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update
LIVE NEWS & UPDATES
-
ही फक्त विजयाची नाही तर नम्रतेची देखील संधी आहे : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग केवळ उत्सवच नाही तर भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणारा आहे. ही केवळ विजयाची नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे. आपले भविष्य सुंदर होणार आहे. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारत ओळखता आला नाही. यांना भारताच्या सामाजिक जाणीवेची पवित्रता माहिती नव्हती. प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांततेचे आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम कोणत्याही आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम केवळ वर्तमान नसून शाश्वत आहे. राम ही समस्या नाही, तो उपाय आहे. राम वाद नव्हे तर, समाधान आहे. फक्त विचार बदलण्याची गरज आहे.
-
न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार : पंतप्रधान मोदी
प्रभू श्रीरामासाठी कायदेशीर लढाई करावी लागली. पण न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल मी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. याच न्यायाने राम मंदिर बांधले गेले.
-
आज संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज प्रत्येक गावात एकाच वेळी कीर्तन-संकीर्तन होत आहे. आज अनेक मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन केले जात आहे, स्वच्छता अभियान राबवले जात आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योतीची जय्यत तयारी सुरू आहे.
-
हजार वर्षांनंतरही या तारखेची चर्चा होईलः पंतप्रधान मोदी
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. हा रामाचा खूप मोठा आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत.
-
आता आमचा राम तंबूत नाही तर भव्य मंदिरात विराजमान आहे : पंतप्रधान मोदी
रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, शतकानुशतकांच्या तपश्चर्येनंतर, संयम, त्यागानंतर आज आपला राम परत आला आहे. आपले प्रभू श्रीराम परत आले आहेत. 22 जानेवारी ही केवळ कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही तर, आजचा दिवस हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही, तर आता दिव्य मंदिरात विराजमान झाला आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हा क्षण अलौकिक आहे. ही ऊर्जा आणि वेळ आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे.
मी नुकताच तुम्हा सर्वांसमोर गर्भगृहातून चैतन्याचा साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. तुम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे पण माझा कंठ दाटून आला आहे. मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्या सर्वांना माफ करतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
पंतप्रधान मोदी हे तपस्वी आहेत : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणारा नाही. आज भारताची शान रामललासोबत परतली आहे. आज आपण ऐकले की, प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी कडक उपवास केला. माझी त्यांच्याशी जुनी ओळख आहे. ते तपस्वी आहेत. पण ते एकटेच तपश्चर्या करतात, आपण काय करायचं? रामलला अयोध्येत आला, तो अयोध्येबाहेर का गेला? रामायणात का निघाला? त्यावेळी वाद झाला होता. तो 14 वर्षे वनवासात गेला. संसारातील कलह संपवून तो परत आला. आज 500 वर्षांनी रामलला पुन्हा आले आहेत.
-
मी भावूक आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे : मुख्यमंत्री योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, रामोत्सवाच्या या शुभ मुहूर्तावर मी सर्वांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. माझे हृदय भावनिक आहे. आज या ऐतिहासिक आणि पवित्र प्रसंगी भारतातील प्रत्येक शहर आणि गाव अयोध्याधाम आहे आणि प्रत्येक रस्ता अयोध्या जन्मभूमीकडे येत आहे. प्रत्येक डोळा समाधानाच्या अश्रूंनी ओलावला आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. आपण त्रेतायुगात प्रवेश केल्याचे दिसते. आज रघुनंदन, राघव आणि रामलला त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे.
-
चरणामृत सेवन करून मोदींनी सोडला उपवास
राम मंदिर सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींनी चरणामृत सेवन करून 11 दिवसांचे उपोषण पूर्ण केले. गोविंद देव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींना चरणामृत पाजले आणि 11 दिवसांचे उपवास सोडवला.

-
गोविंददेव गिरी यांनी पंतप्रधान मोदींना दिली राजर्षी उपाधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच अयोध्येत आजचा सोहळा पार पडला आहे. मोदींनी रामलल्लांसाठी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संपूर्ण नियमांचे पालन केले. हे कुणी सर्वसाधारण व्यक्ती करू शकत नाही. त्यांचे हे कार्य बघून गोविंददेव गिरी यांनी मोदींना राजर्षी ही उपाधी दिली.
-
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अवघ्या एका ओळीचे समर्पक ट्विट करत आजच्या दिवसाचे वर्णन केले. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम ! असे ते म्हणाले.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
-
प्रभू श्रीरामांची PM मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना महापूजा संपन्न
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
-
Ayodhya : गर्भगृहात पंतप्रधान मोदींच्या हस्ते महापूजेला सुरुवात

-
आज अखेर तो ऐतिहासिक क्षण प्रत्यक्षात आला : अनिल कुंबळेंची प्रतिक्रिया
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. कुंबळे यांनी अयोध्येत दाखल होताच एक फोटो ट्विट केला आहे. "गेल्या अनेक दिवसांपासून रामलल्लांच्या दर्शनाची वाट पाहत होतो आज अखेर तो ऐतिहासिक क्षण प्रत्यक्षात आला आहे" असेही त्यांनी म्हंटले आहे . राम मंदिराच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि व्यंकटेश प्रसादही सहभागी होणार आहेत
-
बाजारपेठेत एक लाख कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या उत्साही वातावरणाच व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत असून व्यावसायिकांचा करोडोंचा व्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे. CAT म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या दाव्यानुसार राम मंदिर कार्यक्रमासाठीच्या वातावरणामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे.
-
महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते होणार श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची महापूजा
प्राणप्रतिष्ठापणा पुजेचे मुख्य पुजारी काशीचे अभ्यासक लक्ष्मीकांत दीक्षित असणार आहेत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह 5 जण गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये वास्तव्यास आहे. दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. काशीच्या राजाच्या मदतीने सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत हे काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे.
-
PM मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठानही संपणार...
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी एका ऑडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी आपण अकरा दिवसांचे अनुष्ठान सुरू केल्याचे सांगितले होते. या अनुष्ठानाचे नियम अत्यंत कठोर आहेत. जमिनीवर झोपणे, आहारात फक्त नारळ पाणी घेणे, गोपूजा आणि दान करणे अशा काही नियमांचा समावेश आहे. दिवसभराच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातही या नियमांचे मोदी यांनी तितक्याच कठोरपणाने पालन केले आहे. हे अनुष्ठान उद्या संपणार आहे.
-
Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी दिनचर्या कशी असणार, पुजा कशी सुरु होणार याबाबतची माहिती समोर आली आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गुरुदेव गिरीजी महाराज यांनी माध्यमांसी संवाद साधताना याबाबतची सविस्तर माहिती दिली.
स्वामी गुरुदेव गिरीजी महाराज म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिरात पोहोचल्यावर पंतप्रधान प्रथम स्नानासाठी जातील. त्यानंतर पंतप्रधान मोदी आधी उत्तरेच्या दरवाजाकडे जातील आणि नंतर जिथे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे त्या पूर्वेकडील दरवाजाने प्रवेश करतील. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान प्रथम विश्वस्तांना भेटतील. याशिवाय आम्ही समाजातील विविध व्हीआयपींनाही बोलावले आहे.”
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणाले, “मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंत्रोच्चाराच्या माध्यमातून 10 विविध प्रकारचे स्नान करावे लागते. मंत्रांच्या माध्यमातून 10 वेळा पाणी शिंपडले जाईल. त्यानंतर पंतप्रधान 10 प्रकारचे दान करतील. यानंतर पंतप्रधान मोदी गर्भगृहात प्रवेश करतील. तिथे दुपारी सुमारे 12:20 वाजता पूजा सुरू होईल आणि सुमारे 50 मिनिटे चालेल, असेही त्यांनी सांगितले.
-
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला?
मकर संक्रांतीनंतर 16 ते 24 जानेवारी या दरम्यान सर्व शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे सुरुवातीला 24 जानेवारी ही तारीख प्राणप्रतिष्ठेसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी काशी आणि इतर ठिकाणच्या विद्वानांशी चर्चा केली. त्यामध्ये 22 तारीख हा मुहूर्त निश्चित करण्यात आला.
22 जानेवारीला अभिजीत मुहूर्त जास्त वेळासाठी म्हणजे 84 सेकंद आहे. जेव्हा की, इतर दिवशी ते अत्यंत कमी वेळासाठी राहणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी हा दिवस आणि दुपारी 12 वाजून 29 मिनिटे आणि 8 सेकंद ही वेळ प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निश्चित करण्यात आली.
-
PM मोदी अयोध्येमध्ये दाखल
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.
-
अमिताभ बच्चन ते माधुरी दिक्षीत अन् रणबीर कपूर... तीन पिढ्यांचे सेलिब्रेटी अयोध्येमध्ये दाखल
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येमध्ये महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आयुषमान खुराना, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, राजकुमार हिराणी, अभिनेते चिरंजीवी, जॉकी श्रॉफ, शंकर महादेवन, अनु मलिक आणि इतर कलाकार पोहोचले आहेत.