AAP MLA Goyal : विधानसभेत नोटांचे बंडल घेऊन पोहचले आमदार, लाच म्हणून पैसे दिल्याचा आरोप
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने दिल्ली विधानसभेत थेट नोटांचे बंडल दाखवून त्यांना लाच दिले जात असल्याचा गौम्यस्फोट केला आहे. दिल्लीतील रिठाला विधानसभा मतदारसंघाचे आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी नोटांचे बंडल विधानसभेत फिरवत त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये काही लोक पैसे घेऊन नोकऱ्या देत असल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. “मला गप्प बसवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला” असं गोयल विधानसभेत बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले कि त्यांनी हा मुद्दा नायब राज्यपाल सक्सेना यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला होता.
मोहिंदर गोयल आपल्या बॅगेत १५ लाख रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन विधानसभेत पोहोचले. विधानसभेत बोलताना त्यांनी बॅगेतून नोटा काढून टेबलावर ठेवल्या. हातात नोटांचे बंडल घेऊन ते म्हणाले की, ‘हे टोकन मनी आहे, जे मला लाच म्हणून दिले होते. मुख्य सचिव आणि नायब राज्यपाल यांच्याकडे पैसे देऊन नोकऱ्या देण्याचा मुद्दाही मी उपस्थित केला होता.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी त्याला पत्र लिहिले आहे. पण आज मी माझा जीव धोक्यात घालून हे काम करत आहे. ते लोक गुंडवृत्तीचे आहेत की माझा घातपातही करू शकतात. मी आवाज उठवू नये म्हणून मला पैसे दिले होते.” असा आरोप त्यांनी विधानसभेत केला.
गोयल यांनी आंबेडकर रुग्णालयातील भरतीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे. गोयल यांचा आरोप आहे की, “तिथे ज्या लोकांना नियमानुसार नोकऱ्या द्यायला हव्यात, त्या दिल्या जात नाहीत.” ते म्हणाले की, “सरकारच्या नियमानुसार 80 टक्के भरती जुन्या कर्मचाऱ्यांची असायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. काम मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार आपला हिस्सा घेतात. माफिया व कंत्राटदार सेटींगच्या माध्यमातून पैसे घेऊन कामे देत आहेत. ठिकठिकाणी तक्रारी केल्या, पण कारवाई झाली नाही.”