डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीचं क्रेडिट घेतलंच; ‘या’ दोन देशांतील 37 वर्षांच्या संघर्षाला फुलस्टॉप!

Donald Trump Latest News : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम (India Pakistan Ceasefire) केल्याचं श्रेय अजूनही घेतलं जात आहे. भारताने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला असला तरी ट्रम्प यांनी आपला हेका सोडलेला नाही. आता त्यांनी आणखी एक युद्ध थांबवल्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात मागील 37 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबला आहे. हा संघर्ष थांबावा यासाठी ट्रम्प मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. शुक्रवारी त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी व्हाइट हाउसमध्ये चर्चा केली होती. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी एका अधिकृत शांती करारावर सह्या केल्या.
ट्रम्प यांनी याआधी जगातील जवळपास सहा युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. याआधी त्यांनी दावा केला होता की जर मी सत्तेत आलो तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) थांबवेल. यानंतर ट्रम्प सत्तेत आले पण त्यांना हे युद्ध थांबवणं अजून तरी शक्य झालेलं नाही. परंतु, आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील मागील 37 वर्षांपासूनचा संघर्ष मात्र त्यांनी संपवला आहे. या दोन्ही देशांत बऱ्याच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. व्हाइट हाऊसमध्ये दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार जुना वाद आता थांबवायचा आहे. दोन्ही देशांत आर्थिक सहकार्य आणि कुटनीतीक संबंधात बळकटी आणणे हा आहे.
टॅरिफ बॉम्बनंतर भारताचा अमेरिकेला मोठा झटका?; करोडोंच्या डीलबाबत सरकारचं स्पष्टीकरण
या करारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की दोन्ही देश 35 वर्षांपासून लढत आहेत. आता दोन्ही देश मित्र झाले आहेत. जर राष्ट्रपती ट्रम्प यांना नाही तर मग कुणाला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा? असा सवाल अलीयेव यांनी यावेळी केला.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात गुंतले होते. परंतु, त्यांना या कामात काही यश मिळालं नाही. दुसरीकडे त्यांनी सहा देशांतील युद्ध थांबवल्याचाही दावा केला आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान, इस्त्रायल-इराण, थायलंड-कंबोडिया, रवांडा-कांगो, सर्बिया-कोसावो आणि इजिप्त-इथिओपिया यांचा समावेश आहे.
आर्मेनिया-अजरबैजान वाद काय?
नागोर्नो-काराबाख या विवादीत क्षेत्रावरुन आर्मेनिया-अजरबैजान यांच्यात बऱ्याच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अजरबैजान मधील हा भाग असा आहे जिथे आर्मेनियाई लोकसंख्या बहुमतात आहे. हा संघर्ष बराच जुना आहे. यामागचा इतिहासही अतिशय गुंतागुंतीचा आहे. पाकिस्तानसह तु्र्की आणि इस्त्रायलही या संघर्षात सहभागी आहेत. खरंतर दोन्ही देशांतील हा संघर्ष धार्मिक आहे.
मोठी बातमी! इस्त्रायलचं अखेर ठरलं, गाझा घेणार ताब्यात; नेतान्याहूंचा प्लॅन सुरक्षा परिषदेकडून मंजूर