लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये अशांततेचं ‘मळभ’; वर्षभरात ९४ देशांमध्ये कमकुवत झाली ‘डेमोक्रॉसी’
१७ वर्षांपूर्वी नेपाळ राजेशाहीतून लोकशाहीकडे वळले होते, परंतु आज पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याचा मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे.

IDEA 2025 Report On Democracy : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलन अचानक राजकीय वादळात रूपांतरित झाले. अवघ्या दोन दिवसांत परिस्थिती इतकी बिकट झाली की, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती आहे. एकीकडे नेपाळमध्ये घडलेलं नाट्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतानाच गेल्या वर्षभरात लोकशाही असणाऱ्या तब्बल 94 देशांमध्ये अशांततेचे मळभ पसरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. स्टॉकहोमस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या (IDEA) द ग्लोबल स्टेट ऑफ डेमोक्रसी २०२५ या अहवालातून याचा पुरावा आपल्याला मिळतो.
नेपाळमध्ये पुन्हा राजेशाहीची मागणी
१७ वर्षांपूर्वी नेपाळ राजेशाहीतून लोकशाहीकडे वळले होते, परंतु आज पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याचा मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे. पण ही फक्त नेपाळची कहाणी नाही. तर, गेल्या एका वर्षात जगातील अनेक लोकशाही देशही कमकुवत झाले आहेत.
स्टॉकहोमस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या द ग्लोबल स्टेट ऑफ डेमोक्रसी अहवालानुसार २०२४ मध्ये १७३ देशांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी ९४ देशांमध्ये लोकशाही कमकुवत झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे तर, फक्त एक तृतीयांश देशांनी प्रगती नोंदवल्याचे नमुद करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेवर सर्वात मोठा परिणाम मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका, न्यायाची उपलब्धता आणि प्रभावी संसदेच्या क्षेत्रात दिसून आल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
अमेरिकाही मागे पडली
लोकशाहीवरील या अहवालात अमेरिकेची स्थिती चिंताजनक असल्याचेही वर्णन करण्यात आले आहे. अमेरिका प्रतिनिधित्वाच्या बाबतीत ३५ व्या स्थानावर आहे आणि अधिकारांच्या बाबतीत ३२ व्या स्थानावर आहे. केवळ भागिदारीच्या बाबतीत अमेरिका टॉप-१० मध्ये सहाव्या स्थानावर आहे. अलीकडील निवडणुका आणि राजकीय घडामोडींमुळे अमेरिकन लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचेही अधोरेखित झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.
सर्वात मोठी घसरण आफ्रिका आणि युरोपमध्ये
लोकशाहीतील घसरणीचा सर्वात मोठा वाटा आफ्रिकेचा (३३%) तर, अफ्रिके खालोखाल युरोपचा वाटा (२५%) दिसून आला आहे. लोकशाहीच्या बाबतीत पश्चिम आशिया सर्वात कमकुवत असल्याचे आढळून आले आहे. प्रतिनिधित्व, कायद्याचे राज्य, सहभाग आणि अधिकार या लोकशाहीच्या चारही निकषांमध्ये डेन्मार्क हा एकमेव देश होता ज्याने टॉप-५ मध्ये स्थान मिळवले. तर, जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि लक्झेंबर्ग देखील उच्च स्थानावर आहेत.
प्रेस फ्रिडमला सर्वात मोठा धोका
अहवालात ५० वर्षांतील प्रेस फ्रिडम सर्वात मोठी घसरण असल्याचा गंभीर धोका नमूद करण्यात आले आहे. २०१९ ते २०२४ दरम्यान ४३ देशांमध्ये माध्यम स्वातंत्र्यात घट झाली. यात अफगाणिस्तान, म्यानमार आणि बुर्किना फासो हे सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये होते. येथे पत्रकारांवरील हल्ले, खटले आणि सेन्सॉरशिप वेगाने वाढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.