स्कूल ड्रॉप आऊट अन् हत्येच्या आरोपात तुरुंगवारी; PM पदाचा राजीनामा दिलेले ओली कोण?
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. केपी शर्मा ओली चार वेळेस नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत.

Nepal Protest KP Sharma Oli : भारताचा सख्खा शेजारी नेपाळ आता हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामाच द्यावा लागला. त्यांचा राजीनामा कोणताही वेळ न दवडता मंजूर करण्यात आला. लोक इतके नाराज झाले आहेत की त्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांची घरेच जाळून टाकली. काही जण तर थेट संसदेत घुसले आणि त्यांनी राष्ट्रपती भवानाला आग लावली.
नेपाळ पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थिती (Nepal Protest) नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत मात्र यात त्यांना अपयश आलं आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहताच केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी राजीनामा दिला. पण त्यांना राजीनामा देण्याइतपत नेपाळमध्ये घडलं तरी काय, लोक या सरकारवर इतके का भडकले, केपी शर्मा ओली नेमके आहेत तरी कोण, भारताशी वाद निर्माण करून चीनकडे झुकलेल्या केपी ओलींचं राजकारण कसं राहिलं याची थोडक्यात माहिती घेऊ या..
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. ओली चार वेळेस नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत. विशेष म्हणजे एकदा त्यांना सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान पदावरून हटवले होते. त्यांचा जन्म 1952 आधी नेपाळमध्ये झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण देखील पूर्ण केलं नाही फक्त 22 वर्षांच्या वयात एक शेतकरी धर्म प्रसाद ढकाल यांच्या हत्येच्या आरोपात त्यांना तुरुंगात जावं लागलं.
Nepal Protest : नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?
मार्क्स अन् लेनिनच्या विचारांचा पगडा
ओली यांच्या राजकारणाची सुरुवात 12 व्या वर्षापासूनच झाली होती. या काळात ओली मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होते. सन 1970 मध्ये ते कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. पुढे 1971 मध्ये ओली यांनी झापा विद्रोहाची कमान आपल्या हाती घेतली. नेपाळच्या राजकारणात ही एक मोठी घटना मानली जाते. या आंदोलनात सशस्त्र संघर्ष झाला आणि याच कारणामुळे त्यांना देशातील अनेक तुरुंगात जावं लागलं. ओली यांनी त्यांच्या आयुष्यातील 14 वर्षे तुरुंगात घालवली.
सन 1990 च्या दशकात ओली पंचायत राज व्यवस्थेच्या विरोधात आक्रमक झाले. त्यांनी लोकतांत्रिक आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली. हळूहळू ओली कम्युनिस्ट राजकारणाची ओळख बनू लागले आणि 2015 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले. पण 2016 मध्ये नेपाळी कम्युनिस्ट पार्टी केंद्राचा पाठिंबा माघारी घेतला गेल्याने त्यांना फक्त एकाच वर्षात राजीनामा द्यावा लागला.
प्रचंड यांच्याशी हातमिळवणी अन्..
सन 2018 मधील निवडणुकीत त्यांचा पक्ष सीपीएन-यूएमएलने पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वातील माओवादी पक्षाने केंद्राबरोबर आघाडी करून दोन तृतीयांश बहुमत मिळवले. यानंतर दोन्ही पक्षांचा विलय होऊन नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा उदय झाला. ओली आणि प्रचंड यांनी पंतप्रधानपद सांभाळलं. परंतु, काही काळानंतर प्रचंड यांनी समर्थन काढून घेतलं आणि दोन्ही पक्षांची आघाडीही संपुष्टात आली.
Nepal Protest : ओलींनंतर नेपाळच्या राष्ट्रपतींचाही राजीनामा; थोड्यावेळात घोषित होणार नवे PM
केपी शर्मा ओली ठरले किंगमेकर
सन 2020 मध्ये ओली यांनी अचानक संसद भंग केली. यानंतर घडामोडी वेगात घडल्या. जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओली यांना पंतप्रधान पदावरून हटवून शेर बहादूर देउबा यांना पंतप्रधान नियुक्त केलं. 2022 मधील निवडणुकीत नेपाळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर सीपीएन-यूएमएल आणि तिसऱ्या क्रमांकावर माओवादी पक्ष राहिला.
यावेळी नेपाळी काँग्रेसने प्रचंड यांना पंतप्रधान मानण्यास नकार दिला. तेव्हा प्रचंड यांनी ओली आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी यांचा पाठिंबा घेतला आणि पंतप्रधान बनले. अशा पद्धतीने ओली किंगमेकर ठरले. ओली 2015 मध्ये 10 महिने, 2018 मध्ये 40 महिने, 2021 मध्ये तीन महिने आणि 2024 पासून आतापर्यंत नेपाळचे पंतप्रधान होते. हा सर्व कार्यकाळ धरून ओली आतापर्यंत साडेपाच वर्षांपेक्षा जास्त काळ पंतप्रधान राहिले.