डोनाल्ड ट्रम्प देणार 60 हजार कर्मचाऱ्यांना नारळ, प्लॅन रेडी; संरक्षण विभागात खळबळ!

US Pentagon Layoff : अमेरिकेत सध्या सरकारी नोकऱ्यांत कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू झाला आहे. ट्रम्प सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येक विभागातून शेकडो हजारो कर्मचारी काढले जात आहेत. यातच आता अमेरिकेच्या संरक्षण विभागातून तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा प्लॅन आखला जात आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकारी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. यामुळे प्रत्येक विभागातून कर्मचारी कपात केली जात आहे.
सरकारी कामकाज सुव्यवस्थित करणे आणि कर्मचारी संख्या कमी करणे हा ट्रम्प प्रशासनाचा उद्देश आहे. या कपातीमुळे जवळपास 5 ते 8 टक्के कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. संरक्षण मंत्रालय बजेटमध्ये कपात आणि दक्षतेत सुधारणा करू इच्छित आहे. पैशांचा खर्च आणि अपव्यय कमी करण्याच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने अमेरिकी सरकार मध्ये भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत.
अमेरिकेत शिक्षण विभागाला टाळे? आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांची सही; कारणही धक्कादायक..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारी दक्षता अभियानांतर्गत पेंटागॉन मध्ये 50 हजार ते 60 हजार रोजगार कपात केली जाईल. कर्मचारी कपात, राजीनामे आणि नवीन भरतीवर स्थगिती अशा उपायांच्या माध्यमातून कपात केली जाणार आहे. कर्मचारी कपातीसाठी एक अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा पर्याय दिला जात आहे. रिपोर्ट्स नुसार या पर्यायाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 21 हजारांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ आता बाकीच्या लोकांना जबरदस्तीने नोकरीतून कमी केले जाईल अशी शक्यता आहे.
पेंटागॉनचे उद्दिष्ट आपल्या मनुष्यबळात पाच ते आठ टक्के कपात करण्याचे आहे. या योजनेत नवीन कर्मचारी भरती स्थगित करण्याची कार्यवाही समाविष्ट आहे. असे झाले तर प्रत्येक महिन्याला सहा हजार पदे रिक्त होतील. कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा पर्याय सुद्धा दिला जात आहे. परंतु कर्मचारी याला फारसा प्रतिसाद देत नाहीत. सरकारच्या या धोरणामुळे सुरक्षा विषयक कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प प्रशासन कर्मचारी कपातीच्या दिशेने वेगाने कार्यवाही करत आहे.
शिक्षण विभागालाही लागणार टाळे
डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्षण विभाग बंद करण्याच्या आदेशावर सही केली आहे. ट्रम्प यांच्या पक्षाच्या रडारवर शिक्षण विभाग होता. अमेरिकेतील राज्यांनी त्यांच्या पद्धतीने शाळा चालवाव्यात असे ट्रम्प सरकारला वाटते. या धोरणानुसारच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही शिक्षण विभाग लवकरात लवकर बंद करणार आहोत. यातून आम्हाला काहीच फायदा होत नाही. ज्या राज्यांत शिक्षणाची खरी गरज आहे तिथे आम्ही शिक्षण परत पाठवू. अमेरिकेतील कायद्यानुसार 1979 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण विभागाला काँग्रेसच्या मंजुरीशिवाय बंद करता येणार नाही.