“युद्ध थांबलं नाही तर रशियाला परिणाम भोगावे लागतील”, पुतिन यांना भेटण्याआधीच ट्रम्प यांची खुली धमकी

Donald Trump on Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची (Vladimir Putin) उद्या (शुक्रवार) बैठक होणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध हाच (Russia Ukraine War) महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबलं पाहिजे असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. यासाठी पुतिन यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्या ट्रम्प यांनी मान्यही केल्या होत्या. मात्र युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना स्पष्ट नकार दिला होता. यातच आता ट्रम्प यांनी पुतिन यांना उघडउघड धमकी दिली आहे. या बैठकीत पुतिन जर युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर रशियाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीआधी वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युरोपीय नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. यानंतर झेलेन्स्की यांनी सांगितले की अमेरिका आमचे समर्थन करण्यासाठी तयार आहे. पुतिन मात्र प्रतिबंधांच्या प्रभावाच्या संदर्भात धोका देत आहेत असे युक्रेनचे राष्ट्रपाती झेलेन्स्की यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मोठी बातमी! PM मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच होणार भेट; टॅरिफ कमी होणार?
युरोपीय देशांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे चान्सलर मर्ज यांनी सांगितले की युद्धविराम व्हावा हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर यावर रशिया सहमत झाला नाही तर युक्रेनच्या मित्र देशांनी रशियावर आणखी दबाव टाकला पाहिजे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी युक्रेनला कायम पाठिंबा असल्याचे आश्वासित केले. तसेच पुतिन यांना चर्चेसाठी तयार केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.
युद्धविराम खरंच लागू होणार का
दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत युद्धविरामावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या युद्धविरामाच्या अटी काय असतील याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. युद्धविरामाच्या मोबदल्यात पुतिन यु्क्रेनच्या काही भूभागाची मागणी करू शकतात असे जाणकारांचे मत आहे. झेलेन्स्की यांनी मात्र एक इंच जमीन रशियाला देणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पेच ट्रम्प कसा सोडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.