सांगलीचा वाद राज्यात गाजतोय…. पण जयंत पाटलांच्या मनात वेगळेच काहीतरी शिजतंय…
सांगली लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) यांच्यात तुंबळ युद्धच चालू आहे. ही जागा ठाकरेंकडून परत काँग्रेसकडे (Congress) घेण्यासाठी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असे जिल्ह्यातील एकापेक्षा एक नेते मुंबई आणि दिल्लीत वणवण फिरले. इकडे राज्यात पृथ्वीराज चव्हाण (Prthviraj Chavan), नाना पटोले, बाळासाहेब थोरात या मंडळींनीही हातपाय मारुन पाहिले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्याचवेळी ठाकरेंनी देखील काहीही झाले तरी सांगलीची जागा सोडायची नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी तीन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला, पण ते जागा सोडण्यासाठी तयार झालेले नाहीत.
या दोन पक्षांच्या वादात सांगलीच्या लोकांचे लक्ष मात्र एका चेहऱ्याकडे लागले आहे. हा चेहरा म्हणजे जयंत पाटील…
महाविकास आघाडीतीलच प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून जयंत पाटील यांना ओळखले जाते. पण तेच सध्या कमालीचे मौनात आहेत. सांगलीच्या मुद्द्यावर दोन पक्ष एकमेकांवर तुटून पडलेले असताना, काँग्रेसचे बडे नेते सांगलीच्या जागेसाठी ठाकरेंना विणवण्या करत असताना, शरद पवारांपासून अनेकांनी ठाकरेंना फटकारलेले असताना जयंत पाटील मात्र ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ या भुमिकेत दिसून येत आहेत. इतकेच काय, काहीही संबंध नसलेले भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणेंनीही ‘सांगली’च्या वादात उडी घेतली. पण पश्चिम महाराष्ट्राची आणि सांगलीची नस माहिती असलेले, सांगलीला कोळून प्यायलेले जयंत पाटील या वादापासून दुर आहेत, त्यांच्या या मौनाचा अर्थ काय घ्यायचा? ‘जयंतराव राज्याच्या निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण जयंतराव सांगलीत तर कुठे आहेत? असे सवाल सध्या विचारला जात आहेत…
जयंत पाटील यांच्या याच दीर्घ मौनाचे भाषांतर नेमके आहे तरी काय? पाहुयात सविस्तर…
जयंत पाटील यांनी मौन बाळगल्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे दादा विरुद्ध बापू संघर्षाची पार्श्वभूमी :
जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे एकाचवेळचे जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते. पण एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या उक्तीप्रमाणे हे दोन बडे नेते एकाच जिल्ह्यात, एकाच पक्षात असल्याने दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. हा संघर्ष एवढा टोकाचा झाला की दादांनी बापूंच्या पराभावासाठी इस्लामपूरात मुक्काम ठोकला होता. बापूंच्या पराभवाची मोहीम फत्ते करुनच दादांनी इस्लामपूर सोडले होते.
काँग्रेस सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : मॅच सोडायला विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांचा नकार
याचा वचपा म्हणून जयंत पाटील यांनी दादा घराण्याचा पद्धतशीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. काँग्रेसच्या आणि दादा घराण्याच्या ताब्यातील महापालिका, जिल्हा परिषद, कारखाने, बाजार समित्या अशा संस्था जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या छत्राखाली आणल्या. थोडक्यात काँग्रेसची ताकद कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला. आता हा संघर्ष संपला आहे, असे जयंतरावांनी अनेकदा जाहीर केले आहे. तरी निवडणुका आल्या की वादाची चर्चा होते. विशाल यांना जयंतरावांचा विरोध आहे का, अशी शंका त्यामुळेच घेतली जाते.
सांगलीतून प्रतीक पाटलांसाठी तयारी?
मागील दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2014 मध्ये सांगलीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. 2019 मध्ये काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. त्यावेळी विशाल पाटीलच स्वाभिमानीचे उमेदवार होते. पण त्यांच्यासाठी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने सभा घेतली नव्हती. जयंत पाटील यांनीही विशाल पाटील यांना मित्र पक्षाचा उमेदवार असूनही फारशी मदत न करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. आता यंदा ही जागा ठाकरेंना देण्यामागेही जयंत पाटील यांचाच हात असल्याची चर्चा दबक्या आवाज सांगलीत सुरु आहे.
संजय राऊत यांना तीन दिवसीय सांगली दौऱ्यात ही जागा ठाकरे गटाने लढवण्याबाबत निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला आहे. शिवसेना एकत्र असनाताही सांगलीत त्यांची ताकद नव्हती. तरी ठाकरेंनी ही जागा घेण्याची रिस्क का घेतली? भाजपला एक जागा सहज दिली का? असे सवाल विचारले जातात. पण आत्ता ही जागा ठाकरेंना देऊन पुढच्या पंचवार्षिकला आपल्या पक्षाला मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे जयंत पाटलांचे नियोजन असण्याची शक्यता आहे. त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे हातकणंगलेतून निवडणुकीला उतरतील किंवा यंदाच्या वर्षीच सांगलीतही त्यांचा प्रयोग होऊ शकतो, असे आडाखे बांधले जात होते.
पण माझा मुलगा उभारणार नाही, हे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आता यंदा नाही झाले तरी पुढच्या वेळी हे समीकरण साधता येईल, त्यासाठी जयंत पाटलांनी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचे बोलले जाते. यंदा जागा काँग्रेसला सोडली असती अन् विजय झाला असता तर पुन्हा दादा घरणे सत्तेच्या राजकारणात सक्रिय झाले असते, शिवाय पुढच्यावेळी आघाडीत विजयी जागेवर हक्क सांगता आला नसता. त्यातूनच जयंत पाटील यांनी शांत राहून विशाल पाटील यांचा कार्यक्रम केल्याचे बोलले जाते.
चंद्रहार पाटील हा जयंत पाटील यांचाच पैलवान:
जयंत पाटील यांनी दादा घराण्याचे वर्चस्व मोडित काढण्याचा जो एककलमी कार्यक्रम हाती घेतला होता त्यातूनच चंद्रहार पाटील यांचा राजकीय जन्म झाला आहे. सांगली जिल्ह्यातील विट्याजवळच्या भाळवणी हे चंद्रहार पाटील यांचे मूळ गाव. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटलांनी महाराष्ट्र केसरीचा दोनवेळा किताब पटकावला. त्यानंतर तेव्हाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाळवणी गटातून चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली. ते विजयी झाले. एवढीच काय ती त्यांची ताकद होती. दोन वर्षांपासून त्यांनी थेट लोकसभेची तयारी सुरु केली होती. बैलगाडी शर्यत, रक्तदान शिबीर, युवकांचे मेळावे अशा गोष्टींमधून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.
पण चंद्रहार पाटील हे विशाल पाटील यांना तुल्यबळ उमेदवार होतील याचा कोणीच अंदाज लावला नव्हता. अगदी त्यांना स्वतःलाही नाही. त्यामुळे सुरुवातीला ते वंचित बहुजन आघाडीचे तरी का होईन पण तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मग महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली. ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली, सातारा आणि माढा शरद पवारांकडे, सोलापूर, पुणे काँग्रेसकडेच होती. आता प्रश्न राहिला होता हातकणंगले आणि सांगली मतदारसंघाचा. हातकणंगलेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायची चर्चा सुरु होती. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एका तरी जागेवर मशाल चिन्ह असावे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगलीवर दावा ठोकला, आता हाच दावा त्यांनी कायम ठेवला आहे.
मनसेचे इंजिन महायुतीच्या डब्यांना : कोणत्या मतदारसंघात, किती फायदा होणार?
पण जे चंद्रहार पाटील वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांना थेट मातोश्री बंगल्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यांचा पक्षप्रवेश झाला अन् ठाकरेंनी त्यांना उमेदवारीही जाहीर केली. इथेच त्यांच्या मागे जिल्ह्यातीलच एखाद्या बड्या नेत्याचा हात असावा अशी चर्चा सुरु झाली. कारण मातोश्रीवर प्रवेश मिळविणे अन् उद्धव ठाकरे यांची भेट घेणे हे तसे जिकीरीचे काम. अनेक आमदार, खासदार ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवतात. पण पाटलांना मातोश्रीचा अगदी सहज आशीर्वाद मिळाला, ही अनेकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट आहे.
जयंत पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचे घनिष्ठ संबंध :
सांगलीच्या राजकारणात काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करताना जयंत पाटील यांनी भाजपला स्पेस दिली, असे जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक आजही सांगतात. जयंत पाटलांचा एकेकाळी भाजपशी असलेला दोस्ताना सांगली जिल्ह्यात ‘जयंत जनता पार्टी’ म्हणून ओळखला जात होता. भाजपचे विद्यमान खासदार आणि सध्याचे उमेदवार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादीतील जयंत पाटलांचे जुने सहकारी. आजही त्यांच्या मैत्रीची जिल्ह्यात उदाहरणे दिली जातात. संजय राऊत यांनी विश्वजित कदमांचे विमान ‘गुजरातच्या दिशेने जाणारे आहे,’ असा उल्लेख केला. तशी चर्चा जयंतरावांच्या विमानाचीही होत असते. त्याला जयंतराव उत्तर देताना दिसत नाहीत. याच मैत्रीतून आणि जवळकीतेच्या भुमिकेतून जयंत पाटील शांत आहेत का? आपल्या मित्राचा विजय व्हावा म्हणून ते छुपा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.