‘भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण’; अजितदादांच्या शिलेदाराचं मोठं विधान

Sunil Tatkare Statement On NCP Merger Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या चर्चांचे खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) स्पष्ट खंडन केलंय. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झाला, तरी तो भाजपाच्या (BJP) शीर्ष नेत्यांशी विचारविनिमय करूनच होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
विलिनीकरणाची अधिकृत चर्चा?
सुनील तटकरे म्हणाले, सध्या वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित गट) विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा नाही. पण भविष्यात असा कोणता निर्णय घेण्याचा विचार झाला, तर तो भाजपाच्या नेतृत्वाला विचारूनच घेतला जाईल. भाजपाने आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ.
धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसले; सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा आगडोंब, धोंड्या नेमका कोण?
तटकरे यांनी अधोरेखित केले की, गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमच्याशी भाजप नेत्यांचा व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण आणि समजूतदार होता. 1999 मध्ये आम्ही काँग्रेसविरोधात थेट लढलो होतो. अटलबिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व असतानाही आम्ही भाजपात गेलेलो नाही. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आम्ही विधिमंडळात ठराव संमत करून एनडीएमध्ये असल्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
मुंबई गुजरातचीच, मुंबईत केवळ 32 टक्केच मराठी लोक; दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा ललकारलं
जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा
राज्यात सध्या चर्चेत असलेल्या जनसुरक्षा कायद्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. शरद पवार यांनी या कायद्याला विरोध दर्शवला असला, तरी सत्तेत असलेला अजित पवार गट मात्र याच्या समर्थनात उभा आहे. यावर स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले, सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही कायद्याचे संपूर्ण वाचन केले आहे. त्यामुळे आम्ही या कायद्याला पाठिंबा देत आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही शरद पवार यांच्या विचारांना नाकारतोय, पण सध्याची जबाबदारी वेगळी आहे.
मुख्यमंत्री पदासाठी आशावादी
अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, राजकारणात अनेकदा जे बहुमतात नसतात, त्यांनाही मोठी पदं मिळत असतात. त्यामुळे आम्ही वास्तववादी आणि आशावादी दोन्ही आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याच्या चर्चांवरही तटकरे यांनी पडदा टाकला. ते म्हणाले, निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे माझा दौरा हा त्या त्या भागातील परिस्थिती समजून घेण्यासाठीच आहे.