राज्यातील चार-पाच मंत्र्यांची होणार सुट्टी? अमित शाहांच्या फडणवीसांना सूचना; राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut big Claim on Mahayuti Ministers : राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार अस्थिर करण्यासह घटक पक्षांत वाद निर्माण करुन देण्याचे तर हे प्रयत्न नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली तशी आपल्याकडे होत नाही. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत साडेसहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात नाहीत. त्यांच्याकडे वेळ नाही आणि अशा आमदारांना राज्याचं कृषिमंत्री पद दिलं आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध (Raj Thackeray) हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहीत (Supreme Court of India) याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. याचिका, कोर्ट हे विषय ठाकरेंना काही नवीन नाहीत. या याचिका कशासाठी आहेत तर राज्याच्या हिताची भूमिका मांडली म्हणून याचिका दाखल झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे की याचिका आमचे मेडल आहेत. हे पदक आमच्याकडे असले पाहिजेत.
याचिका नेमकी कशासाठी?
हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्यावतीने वकील घनश्याम उपाध्याय यांनी याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकावण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदीचा विरोध म्हणून मराठी भाषा बोलता न येणाऱ्या आणि परराज्यांतून आलेल्या लोकांवर मराठी लादली जात आहे. त्यामुळे तणाव, हिंसाचार आणि द्वेषासाठी जबाबदार धरून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
“मी आताही राजला फोन करू शकतो अन्..”, युतीच्या थेट प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर