महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका; LPG सिलिंडरची भाववाढ, काय आहेत नवीन दर?
LPG Price Hike : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार (Inflation) झटका बसला आहे. सरकारी तेल आणि गॅस (LPG Price Hike) वितरण कंपन्यांनी आज 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत. या नव्या बदलानुसार आता 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ झाली आहे. कंपन्यांनी फक्त कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासाही मिळाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; LPG सिलिंडर महागलं, काय आहे नवा दर?
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून देशातील विविध शहरांत एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 39 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ फक्त व्यावसायिक सिलेंडरमध्ये आहे. घरगुतील गॅसचे दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या भाववाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरसाठी 1691.50 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात गॅसच्या दरात 8 ते 9 रुपये वाढ करण्यात आली होती. सलग दुसऱ्या महिन्यात भाववाढ झाली आहे. कोलकाता शहरात सिलिंडरचे दर 1802.50 रुपये, मुंबईत 1644 रुपये तर चेन्नई शहरात 1855 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.
चार महिन्यांच्या कपातीनंतर पुन्हा भाववाढ
कमर्शिअल सिलिंडरच्या दरात सलग चार महिने कपात होत होती. परंतु दोन महिन्यांपासून दर पुन्हा वाढू लागले आहेत. ऑगस्टच्या आधी 1 जुलै रोजी सिलेंडरच्या दरात जवळपास 30 रुपये कपात करण्यात आली होती. जून महिन्यात 19 रुपये कमी झाले होते. 1 मे रोजी सुद्धा 19 रुपयांनी कपात करण्यात आली होती. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतच व्यावसायिक गॅसचे दर जवळपास 47 रुपयांनी वाढले आहेत.
जुलैमध्ये झाली होती कपात
जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. दिल्लीत 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती, त्यामुळे ती किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपये झाली होती. कोलकातामध्ये ती किंमत 1787 रुपयांवरून 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1840.50 रुपयांवरून 1809.50 रुपये आणि मुंबईमध्ये 1629 रुपयांवरून 1598 रुपये झाली होती.
घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत असताना, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत. महिला दिवसाच्या निमित्ताने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्या होत्या. सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.