देवेंद्र फडणवीस कंजूष…, अंबादास दानवेंच्या आरोपांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्युत्तर
अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
CM Devendra Fadnavis : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून(chief minister relief fund) ऑक्टोबर महिन्यात फक्त 75 हजार रुपये खर्च करण्यात आल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. लोकांनी कोट्यवधी रुपये पाठवले असताना अत्यल्प रक्कम खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून(CMO Maharashtra) दानवे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danave) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधी पोस्ट करत आरोप केले होते. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट आरोप केले होते. ‘देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. मात्र राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75 हजार रुपये. हा पैसे अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो का? माहिती बाहेर आणणाऱ्या @ivaibhavk या तरुणाचे आभार!’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.
लोकायुक्त सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर! विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेकडूनही शिक्कामोर्तब
दरम्यान अंबादास दानवे यांच्या पोस्टला मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. ‘श्री अंबादास दानवे जी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,’ असे मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिले आहे.
पुढे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14000कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते,” असे सांगण्यात आले आहे.
या उत्तरवर पुन्हा अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत ‘चौकशीअंती कारवाईची वाट पाहतो,’ असे म्हटले आहे.
