लाडकी बहीण योजनेचा मास्टरमाईंड कोण?; फडणवीसांनी योजनेपूर्वीची गोष्ट सांगितली
Devendra Fadnavis : राज्यात आता थोड्याच दिवसांत निवडणुकांचा बार उडणार आहे. महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी वेगळीच आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने महायुती सावध आहे. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. निवडणुकीला थोडेच दिवस शिल्लक राहिलेले असताना महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेत आता राज्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून योजनेवर टीका केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांत मात्र क्रेडिट वॉर रंगलं आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन राष्ट्रवादी-शिवसेनेत खडाजंगी; उमेश पाटलांची नेत्यांना चपराक!
टीव्ही 9 कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात फडणवीसांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. योजना सुरू करण्याची संकल्पना नेमकी कुणाची होती असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.
मध्य प्रदेशात सरकारने मेरी लाडली बहना अशी योजना सुरू केली होती. त्यानंतर एका बैठकीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले आपणही अशी योजना सुरू करावी. अधिकार मुख्यमंत्र्यांचेच असतात. त्यांनी मला अधिकार दिले म्हणून मी उपमुख्यमंत्री आहे. सरकारच्या योजनांचं श्रेय देखील मुख्यमंत्र्याचं असतं. यापेक्षाही मोठं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, असे फडणवीस म्हणाले.
महायुतीत रंगलं क्रेडिट वॉर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी गदारोळ घालत राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेवर आक्षेप घेतला. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’ (Ajit Pawar) असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना चांगलीच चपराक दिली. अर्थसंकल्पादरम्यान, ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ अशी बॅनरबाजी करण्यात आली, त्यावेळी आम्ही विरोध केला नसल्याची आठवण उमेश पाटलांनी करुन दिली.
जयदीप आपटेला राऊतांनीच लपवलं होतं; फडणवीसांनीही लगावला खोचक टोला
उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ म्हणून असे सर्वत्र फिरत होते. त्यावेळी आम्ही कोणीच काही म्हणालो नाही, याचं श्रेय फक्त मुख्यमंत्री घेत आहेत, असं आम्ही म्हटलो नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांनी हे श्रेय घेतलं पाहिजे कारण योजना चांगली लोकप्रिय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज शिंदे गटाच्या मंत्र्यांना गदारोळ करायची गरज नाही.