‘मावळ’ ‘राष्ट्रवादी’कडे गेलं, तर काय करणार? बाळा भेगडेंच्या उत्तराने ‘इलेक्शन पिक्चर’ क्लिअर!
BJP Leader Bala Bhegade Comment on Elections 2024 : लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका. या निवडणुकांची जय्यत तयारी राज्यात (Elections 2024) सुरू आहे. सध्याच्या पॉलिटिकल पिक्चरमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाची राजकीय ताकद ओळखून जागावाटप करावं लागणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार?, कुणाचा पत्ता कट होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, मावळ मतदारसंघात काय परिस्थिती आहे?, हा मतदारसंघ जर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेला तर पुढं काय?, राजकीय विरोधकाचा प्रचार खरंच करणार का?, अशा प्रश्नांची उत्तरं कोणताही आडपडदा न ठेवता माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी दिली आहेत.
माजी आमदार बाळा भेगडे यांनी ‘लेट्सअप चर्चा’ या विशेष कार्यक्रमात अनेक राजकीय मुद्द्यांवर मतं व्यक्त केली. तसेच आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केलं. अजित पवार ज्यावेळी महायुतीसोबत आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही त्यांच्याबरोबर आले. चर्चा अशी असते की जी जागा ज्या पक्षाकडे असते त्यांनाच ती पुन्हा मिळेल. आता मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके आमदार आहेत. 2024 ला जर हा मतदारसंघ त्यांच्याकडे गेला तर तुम्ही नाराज होणार नाहीत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
LokSabha Election : साताऱ्यात उलथापालथ!; …तर उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार?
या प्रश्नाचे उत्तर देताना भेगडे म्हणाले, ‘खरंतर ज्यावेळेस महायुती झाली त्याचवेळेस हा विषय संपला आहे. उद्या पक्षीय पातळीवर जो काही निर्णय होईल, जर उद्या ती जागा राष्ट्रावादीला मिळाली तर आम्ही सगळे राष्ट्रवादीचं काम करू आणि जर ही जागा भाजपला मिळाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपाचं काम करतील. यामध्ये आम्हाला कोणतीच अडचण नाही. आमच्या दृष्टीने पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. या आदेशाशी बांधिल असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.’
पण, ज्याच्या विरोधात एवढं काम केलं. ज्यांच्यामुळं आपल्या राजकीय करिअरला ब्रेक लागला त्यांचा प्रचार करणं तुम्हाला जमेल का?, असा दुसरा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भेगडे म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने माझा पक्ष महत्वाचा आहे. पक्षाला काय देता येईल हे महत्वाचं. माझ्याप्रमाणेच माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आम्ही सगळे संघपरिवारातून काम करणारे कार्यकर्ते आहोत.’
मावळ मतदारसंघात खरंच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेत का? प्रत्यक्षात तशी परिस्थिती येथे दिसत आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘मतदारसंघात परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. आता आमच्याकडे सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदा 18 पैकी 10 जागा महायुतीच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ही एक सुरुवात आहे. आम्ही एकत्र आल्याने तुम्हाला हा बदल दिसतोय. आगामी काळात याचे आणखी चांगले परिणाम मावळमध्ये निश्चितच पहायला मिळतील’, असा विश्वास माजी आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.