इंधन बचतीचा ‘मास्टर प्लॅन’; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे रोखठोक प्रत्युत्तर
Chief Minister opposition criticism मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केले. यावरून विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी
Fuel saving master plan Chief Minister’s strong response to opposition criticism : जागतिक स्तरावर, विशेषतः आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनावरून राजकारण तापले असून विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेच्या झोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा-मस्करी करू नका, हे आवाहन देशहितासाठी आहे,” अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
पंतप्रधानांनी केवळ सार्वजनिक वाहतुकीचा वापरच नव्हे, तर अनावश्यक खरेदी आणि खाद्यतेलाचा वापर कमी करण्याबाबतही सजग राहण्याचे सूतोवाच केले होते. जागतिक संकट दारावर उभे असताना देशाने आत्मनिर्भर आणि सावध राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काही नेत्यांनी तर या आवाहनाची खिल्ली उडवल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
थलापती विजय यांच्या दरबारातून ज्योतिषाची एक्झिट; स्वतःचं ‘भविष्य’ ओळखण्यात पंडितजी फेल!
विरोधकांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “जगातील अनेक प्रगत देशांमध्ये इंधनटंचाईमुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात अशी वेळ येऊ नये म्हणून पंतप्रधानांनी वेळेपूर्वीच देशाला सावध केले आहे. हे दूरदृष्टीचे पाऊल असून त्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे.” राजकारणासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांचे गांभीर्य कमी करू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर ‘बुलडोझर’ निदा खानला मदत करणं भोवलं
विशेष म्हणजे, केवळ आवाहन करून न थांबता राज्य सरकारने स्वतःपासून बदलाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या वाहनांच्या वापरावर मर्यादा आणल्या असून सरकारी दौऱ्यांमध्येही काटकसर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. सरकारचे हे पाऊल प्रशासनातील उधळपट्टीला लगाम लावणारे ठरेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर विरोधक आपली तलवार म्यान करणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.