पुतण्यापासून वाचवा, असे म्हणण्याची वेळ येणारे शरद पवार एकटे नाहीत!

  • Written By: Published:
पुतण्यापासून वाचवा, असे म्हणण्याची वेळ येणारे शरद पवार एकटे नाहीत!

Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. महाराष्ट्रातील राजकारणही काका आणि पुतण्यांच्या राजकीय वादानेच रंगले आहे. विशेष म्हणजे अनेक वादांत पुतण्यांनी काकांना चितपट केले आहे. यातील काकांचे दुर्देव येथेच संपत नाही. ज्या पुतण्यांनी त्रास दिला त्या सर्वांना त्यांच्या काकांनीच कधीकाळी राजकारणाचे धडे दिले होते. मात्र या शिष्यांनीच आपल्या काकांवर मात केल्याचे आपल्याला दिसून येते.

बारामतीच्या काका-पुतण्यांची कहाणी

काका-पुतण्याच्या वादात सध्या प्रत्येकाच्या तोंडी असलेला वाद म्हणजे शरद पवार (Sharad Pawarr) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar). अजितदादांना शरद पवार यांनीच राजकारणात आणले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांपासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अजितदादांना संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवार यांच्या शब्दाला मोठे वजन होते. पवारांसाठी महत्वाच्या असलेल्या पुणे जिल्ह्याचे राजकारण हे फक्त अजित पवारांच्या शब्दावर फिरत होते. अजितदादांच्या वडिलांचे अकाली निधन झाले होते. त्यामुळे अजितदादांवर पवारांचा जीव होता. म्हणूनच आपल्या कुटुंबातील कोणत्या पुतण्याला पुढे आणायचे, याचा जेव्हा पवारांनी निर्णय केला तेव्हा अजितदादांना त्यांनी संधी दिली. त्या वेळी कुटुंबातील इतर पुतणे नाराज झाले. त्याची पर्वा पवारांनी केली नाही.

आता मात्र याच अजित पवार यांनी आपले काका हे काही राजकारणातून निवृत्त होत नाहीत. माझ्या हातात पूर्णपणे कारभार देत नाहीत, असे म्हणत काकांचा पक्षच चिन्हासह आपल्या ताब्यात घेतला. आता पवार काकांना आपल्या पुतण्याविरोधातच लढत द्यावी लागत आहे.


राज ठाकरेंनीही काकांची साथ सोडली…

महाराष्ट्रातील काका-पुतण्याच्या वादाचे दुसरे महत्वाचे उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray). बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. हा पक्ष सत्तास्थानापर्यंत पोहोचवला. हा पक्ष १९९५ मध्ये सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे हे नाव लोकांना माहिती होऊ लागले. काकांचे कलेचे सगळे गुण राज यांच्यामध्ये आले आहेत. वक्तृत्व, व्यंगचित्र, संगीत अशा अनेक बाबतीत राज यांना बाळासाहेबांचा वारसा मिळाला आहे. मात्र २००२ मध्ये बाळासाहेबांनी आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना अधिकृत राजकीय वारसदार घोषित केल्यानंतर राज यांनी वेगळी वाट धरली. आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करत राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापना केली. राज यांनी अजितदादांप्रमाणे आपल्या काकाचा पक्ष पळवला नाही. पण काकांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची राजकीय शक्ती कमकुमत करण्याचे काम राज यांनी नक्कीच केले. त्याबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. पण राज यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, असे अनेकांना वाटते. पण दोघेही आता दोन ध्रुवावर आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी पुढील काळातही सुरूच राहणार आहे.

राज्यात माफियाराज, शिंदेंच्या टोळीत पोलीस आणि गुंड एकत्र; सरकार बरखास्त करा अन्..,; राऊतांचा हल्लाबोल

गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना तीनही मुली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारण सांभाळण्याची जबाबदारी गोपीनाथरावांनी आपला पुतण्या धनंजय (Dhanjay Munde) यांच्यावर सोपवली होती. भाजपमध्ये गोपीनाथरावांचे स्थान उंच होत गेले तसे धनंजय यांनाही संधी मिळत गेल्या. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही धनंजय यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिली. बीड जिल्हा परिषद सदस्य, तेथेच उपाध्यक्ष या पदांवरही धनंजय यांना बसविले. पुढे विधान परिषदेत आमदारही केले. तरीही धनंजय यांचे समाधान झाले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथरावांनी आपली कन्या पंकजा यांना परळीतून संधी दिली. तेथूनच धनंजय यांचे आपल्या काकांशी बिनसू लागले. हा वाद इतका पेटला की त्यांनी काकांची साथ अखेरीस सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करूनच धनंजय यांनी आपले परळीचा आमदार होण्याचे स्वप्न साकार केले. नंतर धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने मुंडे कुटुंबातील दुरावा कमी झाल्याची चिन्हे दिसून येत आहेत. हीच त्यातील विशेष बाब आहे. पंकजा आणि धनंजय या दोघांच्या बोलण्यात एकमेकांविषयीचा कडवटपणा आता दिसून येत नाही.

सुनील तटकरे विरुद्ध अवधूत तटकरे
रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा असलेल्या तटकरे कुटुंबालाही राजकीय भाऊबंदकीने २०१६ पासून ग्रासले. तटकरे कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी
ताकद होती. एकाच वेळी सुनील आणि अनिल हे दोन बंधू विधान परिषदेत होते. तर सुनील यांचे पुतणे अवधूत हे विधानसभेमध्ये आमदार होते. राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे राजकीय वारसदार म्हणूनच अवधूत हे रायगडचा कारभार पाहत होते. रोहा शहराचे नगराध्यक्ष ते आमदार अशी संधी त्यांना मिळाली. पण सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अवधूत हे मागे पडले. या कुटुंबातील वाद फार चिघळला तेव्हा खुद्द शरद पवार यांनी त्यात हस्तक्षेप केला होता. त्यासाठी बारामतीत बैठका झाल्या होत्या. पण तरीही अवधूत आणि सुनील तटकरे सांचे सूर जुळले नाहीत. नंतर सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेत यांनाही राजकारणात आणले आणि आमदार केले. अवधूत यांनी काकांच्या विरोधात भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तेथेही त्यांची आता अडचण झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काका सुनील हे पुतण्या अवधूतवर वरचढ ठरले आहेत.

बीडमधील पुतण्याने काकाला दाखविले आस्मान
बीड जिल्ह्यात क्षीरसागर कुटुंबानेही आपली ताकद राखली आहे. क्षीरसागर बंधूंनी २०१७ पर्यंत एकत्र राजकारण करत सर्व संस्थांवर वर्चस्व अबाधित ठेवले होते. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे दुसरे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे यांनी आपल्या कामाची विभागणी केली होती. स्थानिक कारभार भारतभूषण हे पाहत होते. जयदत्त यांचे तिसरे बंधू रवींद्र यांचे संदिप हे पुत्र आहेत. २०१७ च्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप यांनी आपल्या वडिलांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरविले. त्यामुळे रवींद्र विरुद्ध भारतभूषण क्षीरसागर या दोन भावांतच लढत झाली. येथे संदीप यांनी आपल्या जयदत्त आणि भारतभूषण या दोन्ही काकांना धक्का दिला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात स्वतः रिंगणात उतरले आणि आमदार झाले. सध्या तरी संदीप हे आपल्या काकाच्या विरोधात ठामपणे उभे आहेत. राजकीय भांडणे असलेले क्षीरसागर कुटुंब हे एकाच घरात राहतात, हे मात्र त्यांचे वेगळेपण आहे.

……….

इतर जिल्ह्यांमध्ये काकाविरुद्ध पुतणे लढाई

या महत्वाच्या कुटुंबासोबतच नागपुरात माजी मंत्री अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख यांचाही वाद गाजतो आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आशिष यांनी आपल्या काकांना पराभूत केले होते. ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील विरुद्ध खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही वाद महाराष्ट्राला परिचित आहे. नगर जिल्ह्यात आमदार बबनराव पाचपुते विरुद्ध साजन पाचपुते या काका-पुतण्यातील वाद रंगला आहे. साजन हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काकाला आव्हान देण्याची चिन्हे आहेत.

अशी ही राजकारणातील काका-पुतण्यांची भांडणे असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या कुटुंबात वेगळे चित्र आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर हे गेली अनेक वर्षे काकांसोबत आहेत. एवढेच नाही तर दोघे एकाच वेळी तुरुंगातही गेले होते. काकांनी जी भूमिका घेतली त्यासोबतच समीर राहिले आहेत. छगन भुजबळ हे अजितदादांसोबत गेल्यानंतर समीर यांनीही तोच निर्णय घेतला. एवढेच नाही तर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही स्वीकारले. काकांनीही पुतण्याला एकदा खासदार केले होते. त्यामुळे राजकारणातील सध्याच्या वातावरणात छगन आणि समीर भुजबळ हेच काका-पुतणे सध्या तरी एकत्र आहेत. बाकी बहुतांश कुटुंबात भांडणे ठरलेली आहेतच.

“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube