रायगडात काँग्रेसला धक्का! माजी आमदार पुत्र हाती बांधणार घड्याळ; मुहूर्तही ठरला
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर उद्या हाती घड्याळ बांधणार आहेत.

Raigad News : रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. या मुद्द्यावर महायुतीत (Raigad News) चांगलीच तणातणी आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून पालकमंत्री पदावर दावा सांगितला जात असल्याने याबाबत निर्णय घेता आलेला नाही. पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच अजित पवार उद्या रायगड गाठणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली बातमी मिळाली आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर (Praveen Thakur) उद्या हाती घड्याळ बांधणार आहेत.
प्रविण ठाकूर म्हणाले की काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वडिलांनी 38 वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं आहे. त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली. पण तरीही त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला. रायगडात काँग्रेसने जनतेचे प्रश्न सोडवलेचन नाहीत त्यामुळे या पक्षात राहून काय उपयोग, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली.
कृषिमंत्रिपदाचा राज्यातील नेत्यांना धसका; अनेकांचे राजकीय करिअर गडगडले…
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत. याच वेळी प्रविण ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. ठाकूर यांच्या प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील उरलीसुरली काँग्रेस हद्दपार होणार आहे.
काँग्रेसचे गोरंट्याल भाजपात दाखल
जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळं मराठवाड्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या नेत्याचा पक्षत्याग काँग्रेसला धक्का देणारा ठरला आहे. जालन्याचे काँग्रेस नेते, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा रितसर राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवला होता. त्यांनी मंगळवारी समर्थकांची जालन्यात बैठक घेतली होती. त्यानंतर गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केला.
वाल्मिक कराडचं मुख्य सूत्रधार! सुटका नाही; धनंजय मुंडेंना क्लीन चिट, आमदार धस काय म्हणाले?