“रुसून गावी जायला भास्कर जाधव एकनाथ शिंदे आहेत का?” पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut on Bhaskar Jadhav : कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी नुकताच धनुष्यबाण हाती घेतला. यानंतर आता आमदार भास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणात पक्षांतराचे वारे वाहत असताना ठाकरे गटही कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे स्वतः राजापुरात बैठक घेणार आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनीही मोर्चा सांभाळला आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करत आहोत आमच्या पक्षात लोकशाही आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे राज्य सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. भास्कर जाधव पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द भास्कर जाधव यांनीच पक्षात क्षमतेप्रमाणे काम करु दिले जात नाही अशी खंत व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला.
जाधव यांच्या कुटुंबात लग्न सोहळा असल्यामुळे ते गुहागरला थांबले होते. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो आहोत. आमच्या पक्षात लोकशाही आहे. ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.
शिवसेना ठाकरे गटाची जवळजवळ काँग्रेस झाली; भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर
ईडी हातात द्या, अमित शाह शिवसेनेत येतील
उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर नव्हते का कसला ऑपरेशन टायगर. आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्खं दुकान रिकामं होईल. दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये द्या बावनकुळे पासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारामध्ये दिसतील. आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असे संजय राऊत म्हणाले.
चेंगराचेंगरीत 150 मृत्यू, राऊतांचा दावा
दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था महाकुंभाच्या निमित्ताने सरकारने दाखवली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा तीस आहे पण माझी माहिती आहे की किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावले आहेत. सरकार मात्र आकडा लपवत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.