कृष्णेतील पाणी वितरणाची आखणी पूर्ण; 7 हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली, राणाजगजितसिंह पाटील
Ranajagjitsinh Patil : पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर २०२४ अखेरीस तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होत आहे. त्यानंतर कृष्णेच्या पाणी वितरणाची पुढील आखणी पूर्ण झाली आहे अशी माहिती तुळजापुरचे भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी दिली. ते प्रचार दौऱ्यात बोलत होते.
तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महायुती सरकारने पाठबळ दिल्यामुळे रामदरा ते बोरी-एकुरगा या टप्पा क्र.६ मधील पाणी वितरणाच्या कामाला आता वेग आला आहे असंही ते म्हणाले. तसंच, कृष्णा खोर्यात मराठवाड्याचा १० टक्के भूभाग आहे. त्यामुळे कृष्णा खोर्यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय्य हक्क आहे. माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा खोर्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी २००१ साली मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णयाला मंजुरी मिळवून घेतली असंही त्यांनी सांगितलं.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद असाच मिळत राहिला तर अपेक्षित विकास पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील
या कामाची ठामपणे आपण जबाबदारी स्वीकारली. ती आता पूर्णत्वाकडे जात आहे. हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रूपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सिंदफळ येथील पंपगृहातून डिसेंबर २०२४ अखेरीस २.२४ टीएमसी पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात दाखल होत आहे. रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात जाणार आहे असंही ते म्हणाले आहेत.
पाणी वितरणाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून प्राधान्यक्रम मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात सगळी कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात नव्याने बांधकाम केलेले आणि यापूर्वी अस्तित्वात असलेल्या एकूण १० साठवण तलाव आणि बॅरेजेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेले हे पाणी साठवले जाणार आहे. त्यानुसार अस्तित्वात असलेल्या साठवण तलावांची संख्या ८ एवढी असून नव्याने २ बॅरेजेस तयार करण्यात आले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील २ हजार ८७४ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र कृष्णेच्या पाण्यामुळे निर्माण होत आहे. तर उमरगा तालुक्यातील २ हजार ५७ हेक्टर आणि लोहारा तालुक्यातील २ हजार १४७ हेक्टर क्षेत्र कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. जोड कालव्याद्वारे ८ साठवण तलाव आणि २ बॅरेजेसपर्यंत पाणी वितरण करण्याची आखणी पूर्ण झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.