अखेर शिंदे गटाची चिंता मिटली; मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून ग्रीन सिग्नल
Maharashtra Cabinet Expansion : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक काल पुण्यामध्ये झाली. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते काल पुण्यात दाखल झाले होते. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित होते. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले होते.
या कार्यकारिणीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकते दिले होते. त्यामुळे आता लवकरच राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार, असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच निकालदेखील आलेला आहे. यानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे आला आहे. यावरुन आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे बोलले जात आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येते आहे.
मुंडे, तावडे, खडसेंच्या मार्गावर राम शिंदेंची वाटचाल? खच्चीकरणाच्या चर्चा अन् वरिष्ठांची शांतता!
या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत टीव्ही 9 मराठी या वृत्तावाहिनीने माहिती दिली आहे. पुढिल आठवड्यात 23 किंवा 24 मे रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडलेला होता. संभाव्य मंत्र्यांचे नाव देखील आता समोर आले आहेत. शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.
या विस्तारात भाजपचे 9 तर शिंदे गटाचे 7 मंत्री शपथ घेतील तसेच दोन अपक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर यावेळी मंत्र्यांच्या खात्यांचाही फेरबदल केला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे राज्य सरकार नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे, त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणत्या महिला नेत्याची वर्णी लागते हे पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे.
Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
दरम्यान, सध्याचा विचार केला तर मंत्रिमंडळात वीस मंत्री आहेत. विस्तार रखडल्याने एकाच मंत्र्याकडे दोन ते चार खात्यांचा कारभार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही महसूलमंत्री पदाबरोबरच नगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे. आणखीही काही मंत्री अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.