फडणवीसांच्या डोक्यावर भाजप अध्यक्षपदाचा ताज?; मोदींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

फडणवीसांच्या डोक्यावर भाजप अध्यक्षपदाचा ताज?; मोदींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

Devendra Fadnavis in Delhi : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आज एक महत्वाची घडामोड घडली. तसं पाहिलं तर ही घटना लहानच आहे. पण राजकारणात ज्या चर्चा आता सुरू आहेत त्या लक्षात घेतल्या तर मोठी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) जागी घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या पदासाठी ज्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत त्यात फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षाच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra ) भाजप महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेटीमुळे असे संकेत मिळत आहेत की पक्ष नेतृत्व फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठ्या पदावर नियुक्त करण्याच्या विचारात आहे. याआधी भाजप आणि आरएसएस (RSS) यांच्यात नावांबाबतीत काही मतभेद होते. यामुळे राष्ट्रीय भाजप प्रमुखांच्या नियुक्तीत उशीर झाला. पण आता फडणवीसांबाबत सहमती बनताना दिसत आहे. यामुळेच आताची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Devendra Fadnavis : राजीनाम्याचं काय झालं? फडणवीसांनी दिल्लीतील स्टोरी सूचक शब्दांत सांगितली

आणखी एका नेत्याने सांगितले की फडणवीस यांना एक तर पक्षाचं अध्यक्ष बनवण्यात यावं किंवा त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात यावं असे दोन मतप्रवाह भाजपात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फडणवीसांना अध्यक्ष बनविण्याच्या बाजूने आहे. यामुळे फडणवीस केंद्रीय राजकारणात दीर्घ काळ भूमिका बजावत राहतील. फडणवीस नागपूरचे आहेत. संघाचं मुख्यालय सुद्धा नागपूर आहे. पीएम मोदींचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना अध्यक्ष होण्यात फारशा अडचणी नाहीत असे सांगितले जात आहे.

आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही या घडामोडींची खात्री केली. फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला. कशाबशा नऊ जागा जिंकता आल्या. अशा परिस्थितीत आता फडणवीसांना महाराष्ट्रात ठेवण्यात काहीच अर्थ नाही. मराठा समाजात त्यांच्याबद्दल मोठा रोष आहे. दलित वर्गातही मोठी नाराजी दिसून येते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कामकाजात आघाडीवर ठेवणे हा निर्णय योग्य होणार नाही असे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube