जमिनी पाण्याखाली, जनावरं-गाड्या गेल्या वाहून! पावसाचा धोका पुन्हा वाढला, आज 33 जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Maharashtra Rain

Maharashtra Rain Update Alert For 33 Districts : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रायगड, पुण्याचा घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, नांदेड या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी पडतील, असा अंदाज आहे. राजस्थानातून मान्सून परतू लागला असून ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातूनही माघार घेईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

पुराचा वेढा

पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पुराचा (Flood) वेढा निर्माण झाला आहे. उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीतून मोठी वाढ झाली. तर पंढरपूरची भक्त पुंडलिकांसह असणाऱ्या इतर मंदिरांना देखील (Maharashtra Rain) पाण्याने वेढा दिलाय. त्यामुळे यंदाच्या वर्षी सलग पाचव्यांदा पुराचा वेढा पंढरपूरला बसलेला दिसून येतो.

ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना शहराला रात्री पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. शहरात मध्यरात्रीपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालं. शहरातील बसस्थानकाजवळील लक्कडकोट येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याचं बघायला मिळालंय. त्याचबरोबर गायत्रीनगर, फ्रेजर बॅाईज परिसर, कोठारी नगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारंबळ उडाली.

जालना शहरात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने बस स्थानक परिसरामध्ये दुकानांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे आमदार अर्जुन खोतकर यांनी नऊ वाजता भेट दिली. यावेळी अगोदर आमच्या दुकानात पाहणी करा, या मागणीत दोन गटात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासमोरच तुफान हाणामारी झाली आहे. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करत वाद मिटवला. मात्र, बस स्थानक परिसरामध्ये काही तणावाचे वातावरण पसरले आहे.

घर उध्वस्त झाली

अहिल्यानगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. घरं उध्वस्त झाली आहेत, पंचनामे नको. मदत द्या, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवा, भरीव मदत द्या,अशी तनपुरे यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

follow us