“मला अटक केली तर दोन कोटी धनगर तुरुंगाला वेढा देतील”; उत्तम जानकरांचा भाजपला थेट इशारा

“मला अटक केली तर दोन कोटी धनगर तुरुंगाला वेढा देतील”; उत्तम जानकरांचा भाजपला थेट इशारा

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सध्या उत्तम जानकर यांची चांगलीच चर्चा होत आहे. महायुतीच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही जानकरांना आपल्या गटात घेण्यात त्यांना यश मिळालं नाही. आता जानकरांनी महायुती विरोधात रान उठवलं आहे. काल पंढपुरात महाविकास आघाडीच्या सभेत त्यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली. तसेच सरकारला सूचक इशाराही दिला. महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा आरोप त्यांनी केला. तसेच मला जर अटक केली तर दोन कोटी धनगर समाज त्या तुरुंगाला वेढा देईल, असा इशारा जानकर यांनी यावेळी दिला.

Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उत्तम जानकरांनी महायुतीच्या नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली. जानकर पुढे म्हणाले, महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची भाषा केली जात होती.  असं राजकारण मी माझ्या राजकीय आयुष्यात कधी पाहिलं नाही. जर त्यांनी मला अटक केलीच तर राज्यातील दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा दिल्याशवाय राहणार नाही.

मी जवळपास 30 ते 35 वर्षे भाजपात काम केलं. 2014 मध्ये सरकार आलं त्यावेळी आमच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. दिल्लीत आणि राज्यात दोन्हीकडे त्यांचच सरकार होतं. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी तांब्याभर पाणी मागितलं ते तर दिलं नाहीच.  उलट अजितदादांच्या धरणातील प्या असं सांगितल्याची आठवण जानकरांनी या भाषणात करून दिली.

फसवणुकीचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरलो

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यास मी इच्छुक होतो. त्यासाठी मी पक्षाकडे तिकीटही मागितलं होतं. पण, त्यांनी माझी फसवणूक केली. या फसवणुकीचा हिशोब करण्यासाठीच आता मी मैदानात उतरल आहे, असा इशारा माजी आमदार उत्तम जानकर यांनी भाजपला दिला.

‘मी फाउंडर सदस्य, अजितदादांनाही पक्षातून काढू शकतो’ उत्तम जानकरांची फटकेबाजी

दरम्यान, माढा लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर आता महाविकास आघाडीसोबत आले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते राजकीय विरोधक मानले जातात. परंतु, भाजपाने काही गोष्टी पाळल्या नाहीत म्हणून नाराज होत त्यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. भाजपने फक्त मलाच फसवलं असं नाही तर मोहिते पाटलांनाही फसवलं. सोलापूर लोकसभेसाठी मी काही स्वतःहून गेलो नाही तर विजयकुमार देशमुख आणि प्रशांत परिचारक घेऊन गेले होते. त्यांच्या कुटनितीची तो भाग होता. मला तर त्यांना तिकीट द्यायचचं नव्हतं. फक्त मोहिते पाटलांना भीती दाखवायची होती, असे वक्तव्य उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube