आज वाशीतच मुक्काम, पण रात्री GR न काढल्यास उद्या आझाद मैदान गाठणार : जरांगेंकडून अखेरची डेडलाईन

आज वाशीतच मुक्काम, पण रात्री GR न काढल्यास उद्या आझाद मैदान गाठणार : जरांगेंकडून अखेरची डेडलाईन

मुंबई : मराठा समाजातील ज्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज रात्री काढा, अन्यथा उद्या (27 जानेवारी) मुंबईत आझाद मैदानावर धडक देणारच, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला आहे. नवी मुंबईमध्ये शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शिष्टमंडळासोबत काय-काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माहिती दिली. (Manoj Jarange Patil has warned that pass the Maratha reservation ordinance tonight or else he will go on fast to death at Azad Maidan from tomorrow.)

तरीही आझाद मैदानाला जाणारच!

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने उद्या सकाळपर्यंत सरकारकडे वेळ आहे. आज रात्रीत आम्हाला सगेसोयऱ्यांचा जीआर द्या. अन्यथा उद्या सकाळी आझाद मैदानावर धडक देणार. उद्यापासून आमरण उपोषण चालू करणार आहे. आमच्यासाठी हा जीआर खूप महत्वाचा आहे. हा जीआर घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही. मात्र जर हा जीआर रात्री दिला तर उद्या सकाळी गुलाल उधळायला आझाद मैदानावर जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडे 10 मोठ्या मागण्या :

आतापर्यंत 54 पैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहेत. उर्वरित लोकांनाही लवकरात लवकर प्रमाणपत्र वितरीत करा.

नेमके कोणत्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले, याचा डाटा द्यावा.

शिंदे समिती बरखास्त करु नये. नोंदी शोधण्याचे काम सुरुच ठेवावे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, जरांगे पाटलांनी थोडं सबुरीनं घ्यावं; मंत्री विखे पाटलांचा सल्ला

ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सगेसोयऱ्यांनाही त्याच आधारे प्रमाणपत्र द्यावे. त्याचा अध्यादेश आम्हाला हवा आहे.

ज्यांच्याकडे नोंद सापडलेली नाही, त्या मराठा बांधवांनी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्याशी संबंध असलेले शपथपत्र द्यावे. त्या शपथपत्राच्या आधारे लगेच त्यांनाही प्रमाणपत्र द्यावे.

सदर शपथपत्र 100 रुपयांच्या स्टँम्पवर घेऊ नये. हे शपथपत्र मोफत होईल याची सुविधा करावी.

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेतले जावेत.

सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटीशनचा निकाल येईपर्यंत आणि सगेसोयऱ्यांचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत मराठा समाजातील सर्व बांधवांना सगळ्या प्रकारचे शिक्षण 100 टक्के मोफत केले जावे.

100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून भरती करायची.

जिल्हास्तरावर मराठा समाजासाठीच्या शासकीय वसतिगृहाचा प्रश्न निकाली लावा.

Maratha Reservation : …तर ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल; मंत्री छगन भुजबळांना सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. आज लाखो समाजबांधवांसह जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले. जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जरांगे पाटील रांजणगाव गणपती येथे असताना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दडकर आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय येथे आले होते. त्यांनी सरकारचा तीन कलमी प्रस्ताव पहाटे चार वाजता जरांगे यांच्यासमोर ठेवला. उभयतांत दीड तास चर्चा झाली मात्र तोडगा निघाला नाही. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.

त्यानंतर जरांगे पाटील लोणावळ्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यात हात आखडता घेतला जाणार नाही. आरक्षणासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. जरांगेंनी मुंबईला येण्याचे टाळावे असे आवाहन केले होते. त्यानंतर जरांगे यांना मुंबई पोलिसांची नोटीस येऊन धडकली. आझाद मैदानात परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या बातम्या फेटाळून लावत जरांगे यांनी आझाद मैदानात परवानगी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज वाशीत असताना सरकारकडून पुन्हा एकदा शिष्टमंडळ पाठवून जरांगेंसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी पुन्हा एकदा 10 मागण्याचा प्रस्ताव देत जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला परत पाठविले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube