मध्यरात्री घरी आला अन् चाकून केले सपासप वार; परळीत तरुणीवर जीवघेणा हल्ला
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतलं आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात (Beed) एका 23 वर्षीय तरुणीवर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंचशील नगर परिसरातील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणीवर मध्यरात्री चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा (निजाम) येथील मूळ रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने ती गेल्या काही वर्षांपासून परळी वैजनाथ येथे राहत असून पंचशील नगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होती. रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता. परळी वैजनाथ) हा तिच्या राहत्या ठिकाणी पोहोचला. आरोपी आणि पीडित तरुणी यांची कामाच्या ठिकाणी ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नीट पेपरफुटीतील आरोपी कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर; बीड पालीकेची कारवाई
तीथ पोहोचल्यानंतर आरोपीने तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची वाढल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत तरुणीला धमकावलं. “तू माझ्याशी का बोलत नाहीस?” असा जाब विचारत त्याने संतापाच्या भरात तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितलं जात आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने जवळील धारदार चाकू काढून तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर आणि डाव्या हाताच्या दंडावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
चाकू हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने परळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यामुळं तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिचा एमएलसी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (6 जून) दुपारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, धमकी देणे यासह गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा समावेश करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतलं आहे.