छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात दुपटीने वाढ, पोलीस आयुक्तांचा धक्कादायक खुलासा
आयुक्त प्रवीण पवार यांनी वर्षभरात दाखल आणि उकल केलेल्या विविध गुन्ह्यांशी संबंधित 'प्रगती-पुस्तक' प्रसिद्ध केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. (Sambhajinagar) दरम्यान, आयुक्तालयांतर्गत अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत अर्थात ॲट्रॉसिटीअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यातमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी वर्षभरात दाखल आणि उकल केलेल्या विविध गुन्ह्यांशी संबंधित ‘प्रगती-पुस्तक’ प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.
पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या तुलनेत ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. शहरामध्ये जवळपास १८ पोलीस ठाणे असून त्या अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती कायद्यांन्वये २०२४ मध्ये ५८ दाखल गुन्हे होते. तर २०२५ मध्ये १०३ गुन्हे दाखल असल्याची माहिती येथे देण्यात आली.
संभाजीनगरमध्ये भाजपच्या अहंकारामुळे शिवसेना-भाजप युती तुटली; संजय शिरसाटांची घोषणा
पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा कार्यरत असून, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मुले, मुली हरवलेले संबंधाने गुन्हे दाखल आहेत. संबंधित मुले, मुली मिळून न आल्यास सदरचे गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेकडे वर्ग करण्यात येतात. त्यामध्ये तांत्रिक तपास करून व ऑपरेशन मुस्कान राबवून एकूण पाच मुले व १९ मुलींचा शोध लावण्यात यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
आयुक्तालयांतर्गत स्थापन केलेल्या दामिनी पथकाने शहरातील एकूण १९८ शाळा, महाविद्यालय, झोपडपट्टी परिसर, मोहल्ला, महिला, पालक मेळावा, वस्तीगृह, आश्रमशाळांना भेटी देऊन एकूण १९८ कार्यशाळा घेतल्या. त्यांना विविध पातळीवर मार्गदर्शन केले. तसेच आठ महिलांना समुपदेशन करून आत्महत्येपासून परावर्त केले.
छेडछाड प्रकरणांमध्ये दहा महिलांना घटनास्थळी जाऊन मदत केली. तसेच ३३० पीडित महिला व मुली, वयोवृद्धांना, मनोरुग्णांना मदत केली. १४ बालविवाह थांबवले व ९० व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली, असेही पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
