Jalna : ‘आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावला…’, संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आज या घटनेविरोधात जालन्यामध्ये (Jalna Morcha) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखही सहभागी झाली होती. दरम्यान, मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये बोलतांना वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) भरमंचावर ढसाढसा रडली.
Jalna Morcha : ‘आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावला…’, संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जालना शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ज्योती मेटे सहभागी झाल्या होत्या. सभेला संबोधित करतांना वैभवी देशमुख म्हणाली की, या मंचावर माझ्यासमोर एक फुल आहे. हे फुल आज उन्हामुळे सुकलं. वडिलांच्या हत्येनंतर आम्हीही सावरू शकलो नसतो. आम्ही आत्महत्या केली असती. कारण, आमच्या कुटुंबाचा आनंद, आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावल्या गेला. पण, ही कळी अजूनही फुले शकते…. आपल्याला न्याय मिळायचा आहे. मानवतेच्या नात्याने एकत्र येऊ तुम्ही आमच्यासाठीउभे राहिले. यापुढेही असंच आमच्या पाठीमागे उभं राहा, असं वैभवी म्हणाली.
पुढं ती म्हणाली की, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माझा सवाल आहे की, माझ्या वडिलांना तुम्ही वेदनादायी मरणं का दिलं? त्यांची हत्या का केली? असं म्हणत वैभवी धाय मोकलून रडली. पप्पा तुम्ही जिथं कुठं असाल तिथंही हसत राहा, असंही ती म्हणाी.
आरोपींना लवकरात लवकर अटक करा – धनंजय देशमुख
तर धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल, यासाठी जनता प्रयत्न करत आहे. राज्यातील अनेक भागातील लोक मोर्चा आयोजित करत आहे. यातून एकच मागणी केली जात आहे, ती म्हणजे, देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची…. तपासात गती यायला हवी, तर ज्या आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे, माझ्या भावाला न्याय द्या, असं ते म्हणाले.