‘लक्ष्मण हाके’ ओबीसी समाजाचा नवा चेहरा? जानकर, पडळकरांचेही मार्केट खाल्ले…

‘लक्ष्मण हाके’ ओबीसी समाजाचा नवा चेहरा? जानकर, पडळकरांचेही मार्केट खाल्ले…

महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे हे अलिकडच्या काळातील धनगर (Dhangar) आणि ओबीसी (OBC) आरक्षणासाठी लढणारे काही प्रमुख चेहरे. मुंडे-भुजबळांव्यतिरीक्त हे तीन चेहरे नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावर तडफेने भांडत राहिले, प्रसंगी रस्त्यावर उतरुन लढले. या तिघानंतर आता ‘लक्ष्मण हाके’ (Laxman Hake) हेही या ओबीसी आंदोलनाचा एक नवा चेहरा म्हणून उदयास आलेत. हाके यांच्या नऊ दिवसांच्या उपोषणाला राज्यातून पाठिंबा मिळाला. दररोज हजारो लोकं त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत होते. या दरम्यान, हाके यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे आतापर्यंत नऊ किलो वजन कमी झाले. ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला. त्यातून डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमरेजचाही धोका सांगितला होता. पण तरीही हाके लढत राहिले… त्यांना मिळणारा पाठिंबा वाढतच राहिला. हाके यांनी केलेल्या याच सगळ्या वातावरणनिर्मितीमुळे त्यांनी आता जानकर अन् पडळकरांचेही मार्केट खाल्ल्याची चर्चा आहे… (Laxman Hake has also emerged as a new face of this OBC movement)

पाहुयात सविस्तर…

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. त्यामुळे मूळ ओबीसींच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे. ओबीसी, व्हीजेएनटीचा दाखला काढायला प्रशासन किमान महिना, दोन महिने लावतात, असे अनेक आक्षेप नोंदवत हाके उपोषणाला बसले होते. ओबीसी आरक्षणात होणारा मराठा समाजाचा प्रवेश हा हाकेंचा मुख्य आक्षेप आहे. यापूर्वी याच आक्षेपावरुन छगन भुजबळ यांनीही ओबीसी एल्गार मेळावा घेतला होता. संपूर्ण राज्यातील ओबीसी नेत्यांना त्यांनी एकाच मंचावर आणले होते. याच मेळाव्यात महादेव जानकर यांनी भुजबळांचे पाय धरले होते. त्यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे म्हंटले होते.

खरंतर भुजबळ हे 90 च्या दशकापासून ओबीसी आंदोलनाची लढाई लढत आहे. त्यांनी शिवसेनेत असतानाच समता परिषदेची स्थापना केली होती. त्यामाध्यमातून ते देशाचे नेतृत्व करायला लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली ती देखील ओबीसीच्याच मुद्द्यावर. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाला विरोध केल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनाही ओबीसी नेते म्हणून ओखळले जात होते. त्यांनीही राज्यापासून केंद्रापर्यंत ओबीसी प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला. धनगर आरक्षणासाठी संसद हादरवून सोडली. गोपीनाथ मुंडे यांच्या माघारी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे नैसर्गिक न्यायायाने ओबीसींचे नेतृत्व आले आहे.

Video : भुजबळ, जानकर, मुंडे बंधू भगिनींना टार्गेट कराल तर, गाठ माझ्याशी; हाकेंचं जरांगेंना चॅलेंज

थोडक्यात ओबीसी चेहरे म्हणून भुजबळ आणि मुंडे यांची रेष मोठी आहे. पण महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे अगदी अलिकडील काही वर्षांमध्ये चर्चेत आलेले चेहरे. जानकर हेही मागील अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणाची लढाई लढत आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना 2014 मध्ये महायुतीत आणले. धनगर चेहरा महायुतीत आल्याचा मोठा फायदा झाला. तिथपासून त्यांच्या राजकीय प्रवासाचीही सुरुवात झाली. 2014, 2024 या दोनन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी लाखोंच्या संख्येने मते घेतली. मध्यंतरी फडणवीस मंत्रीही झाले.

गोपीचंद पडळकर ही बऱ्याच वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी लढत आहेत. पण ते खरे चर्चेत आले ते 2019 मध्ये. त्यावर्षी लोकसभा निवडणुकीत पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांनी तीन लाख मते घेतली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू विशाल पाटील पराभूत झाले. त्यानंतर त्याचवर्षी त्यांनी बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवली. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिल्याने पडळकर राज्यभरात चर्चेत आले. तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. पण लगेच ते विधान परिषदेवर आमदार झाले.

दोन्ही नेत्यांपेक्षा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला लोकांचा पाठिंबा :

मात्र या दोन्ही नेत्यांपेक्षा लक्ष्मण हाके यांच्या आताच्या उपोषणाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. हाके यांचे नऊ दिवस उपोषण चालले. या काळात हाके यांना संपू्र्ण राज्यातून पाठिंबा मिळाला. लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप हे आठव़डाभर हाके यांच्या उपोषणस्थळी होते. लेट्सअप मराठी हे हाके यांच्या उपोषणस्थळी पोहचणारे पहिली वृत्तवाहिनी होती. तिथे त्यांना आलेला अनुभव हा जरांगेंच्या आंदोलनाप्रमाणेच होता. ज्याप्रमाणे जरांगे यांना लोकांनी उचलून धरले तसेच हाके यांच्याबाबतीतही झाले. ओबीसी आरक्षण संकटात येत आहे, या भीतीपोटी अनेक ओबीसी बांधवांनी वडीगोद्रीमध्ये गर्दी केली. दररोज 500, 600 गाड्या आंदोलनस्थळी भरुन येत होत्या.

सानप यांच्यामते या नऊ दिवसांत किमान तीन लाख बांधवांनी हाकेंची भेट घेऊन त्यांना आपले समर्थन दिले. यात बीड, परभणीमधील बांधवांची संख्या मोठी होती. शिवाय गडचिरोली, अमरावती, पुणे, सांगली अशा भागातूनही लोकं येत होती. नेत्यांचा राबता मोठा होता. पंकजा मुंडे यांनीच सर्वप्रथम हाके यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या फक्त लक्ष वेधून शांत बसले नाहीत. त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पाठोपाठ धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश आण्णा शेंडगे यांनी भेट दिली. सरकारमार्फत मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, उदय सामंत, गिरीश महाजन यांनी चर्चा केली. प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार, भागवत कराड या नेत्यांनी हाकेंना पाठिंबा दिला.

हाकेंची वातावरण निर्मिती :

थोडक्यात हाके यांनी नऊ ते दहा दिवसांमध्येच वातावरण निर्मिती केली. लोकसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या पराभवामुळे हा समाज नाराज झाला होता. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींचे राजकारण संपल्याचे बोलले जाऊ लागले. याचवेळी हाके यांनी याबाबत आवाज उठविण्याचा पवित्रा घेतला. सत्तेला चिकटलेले किंवा सत्तेच्या राजकारणात अडकलेले ओबीसी नेते या आंदोलनात थेटपणे उतरु शकत नव्हते. जरांगे यांना अंगावर घेऊ शकत नव्हते. ही उणीव हाके यांनी बरोबर शोधली. ओबीसी आंदोलनात जीवाची बाजी लावण्याचा निर्धार केला. हाके हे कधीकाळी जानकर यांचे कार्यकर्ते होते. रासपचे प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर येत होते.

पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना दिलासा, फडणवीसांनी केली मोठी घोषणा

राजकीय यश मिळविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. माढा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. शिंदेंसोबतही त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्तीही केली होती. या आयोगावर असताना मराठा आरक्षणाबाबत त्यांनी थोडीशी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. दुसरीकडे आपली राजकीय ताकद आजमवण्यासाठी त्यांनी माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना केवळ पाच हजार मतांवर समाधान मानावे लागले.

राजकीय नेता म्हणून फारशी प्रगती होत नाही, हे लक्षात येताच त्यांनी निवडणूक संपताच ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आक्रमक भूमिका घेतली. जरांगे यांना जशास तशे उत्तर देण्याची तयारी केली. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता समाजाच्या बळावर आंदोलनाचा मार्ग त्यांनी पत्करला. अस्वस्थ असलेल्या ओबीसी समाजाला हाकेंच्या रुपाने पर्याय दिसला. हाके यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सहाजिकच प्रस्थापित ओबीसी नेत्यांवरील झोत कमी झाला. हाकेंनाही आपली राजकीय क्षितिज विस्तारण्याची संधी मिळाली. सर्वच प्रस्थापित ओबीसी नेत्यांसमोर हाकेंना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हाके हे धनगर समाजातून येत असल्याने त्या समाजातही त्यांचे वजन या आंदोलनाने वाढले.

महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, राम शिंदे आदी प्रस्थापित नेते निवडणुकीच्या राजकारणात असल्याने ते हाके यांच्याप्रमाणे जीवाची बाजी लावून आंदोलन करु शकत नव्हते. हाके यांनीही ही संधी साधली आणि आपला दबदबा आणखी उंचीवर नेऊन ठेवला. यामुळेच इतर सर्व ओबीसी नेत्यांपेक्षाही हाके यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. आता यातून हाके यांच्यासारखा नवा ओबीसी नेता तयार झाला आहे. सहाजिकच जानकर, पडळकर यांच्यासारख्या प्रस्थापितांना पर्याय हाके यांच्या रुपाने उभा राहू शकतो. त्यामुळे या नेत्यांचे मार्केट सध्या तरी हाके यांनी डाऊन केले आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज