धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition candidate Rajabhau Phad has filed a petition in the High Court against Minister Dhananjay Munde.)
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढलेल्या राजाभाऊ श्रीराम फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासाडायला पाहिजे; उदयनराजे भोसले संतापले
मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंडे यांनी शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केला नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, तसेच बँकेतील जॉइंट अकाउंट, मालमत्ता व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे यांची माहिती दडवून ठेवली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
कोणीही असू दे, संतोष देशमुखांच्या प्रत्येक मारेकऱ्यावर कारवाई होणार! CM फडणवीसांचा बीडमध्ये जाऊन इशारा
याशिवाय निवडणुकीपूर्वी राजा भाऊ फड यांनी याचिका दाखल करून परळी मतदारसंघातील 233 पैकी 122 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्याची विनंती केली होती. याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून लोकशाही पद्धतीने निर्भय वातावरणात निवडणूक घेण्याचे, तसेच इतर बाबींबद्दल केलेले निवेदन लेखी हमी म्हणून स्वीकारून खंडपीठाने याचिका निकाली काढली होती. परंतु धनंजय मुंडे यांच्या राजकीय दबावापोटी निवडणूक आयोगाने शपथपत्रात नमूद केलेला शब्द पाळला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.