मराठवाड्यात पाणीटंचाईचं मोठं संकट; 63 गावांची तहान भागवण्यासाठी 106 टँकर

शहरातील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Photo   2026 05 02T173753.499

कडक उन्हाळ्यामुळे यंदा मराठवाड्यात (Water) पाणीटंचाई तीव्र होत आहेत. पाण्याचे स्रोत वेगाने आटू लागले असून सद्यःस्थितीत मराठवाड्यातील ६३ गावे आणि २६ वाड्या यांना पाणी पुरवण्यासाठी १०६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विभागीय आयुक्तालयाने २९ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही गंभीर स्थिती समोर आली आहे.

टंचाईची सर्वाधिक झळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसत असून येथील ४५ गावे आणि १२ वाड्या यांसाठी ७३ टँकर्स चालू आहेत. जालना जिल्ह्यातील १६ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३१ टँकर्स, तर लातूर जिल्ह्यातील २ गावे आणि १ वाडीसाठी २ शासकीय टँकर्स धावत आहेत. सद्यःस्थितीत एकूण १०६ टँकर्सपैकी ४ शासकीय आणि १०२ खासगी टँकर्सचा वापर करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने मराठवाड्यातील (बीड आणि धाराशिव वगळता) इतर सर्व जिल्ह्यांतील १५४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. मागील वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा टँकर्सची संख्या निम्मी आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात १४२ गावे आणि २४ वाड्यांसाठी २१५ टँकर्स चालू होते. यंदा बीड आणि धाराशिव या २ जिल्ह्यांमध्ये सध्या तरी टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

कोल्हापूर शहरातही परिस्थिती गंभीर

सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून या वर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने, तसेच पर्जन्यमानामध्ये घट होणार आहे. परिणामी काळम्मावाडी आणि शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणीउपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणीसाठा पावसाळा चालू होईपर्यंत पुरवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी शहरातील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us