शिवसेना मराठवाड्यात कमकुवत का होत गेली?, चौकाचौकात झेंडे दिसणाऱ्या पक्षाला का नाकारलं?

शिवसेनेच्या आमदार खासदार फुटीनंतर अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव आणि ओम राजेनिंबाळकर हे ठाकरेंसोबत राहिले.

News Photo   2026 06 23T171631.182

मराठवाड्यात शिवसेना वाढली ती बाळासाहेब ठाकरे (Shivsena) यांच्या आक्रमक भाषणांवर. काँग्रेस राष्ट्रवादीतील मातबर नेत्यांना जाब विचारता येईल अशी ताकद बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये निर्माण केली. या काळात भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांची चौकाचौकात अंमलबजावणी करणारा पक्ष म्हणजे शिवसेना. आता ती ताकद शिवसेनेच्या ठाकरे गटात राहिली आहे का? मराठवाड्यात निवडून आलेल्या तिन्ही खासदारांनी शिवसेनेच्या ठाकरे गटास सोडचिठ्ठी दिली आहे. ही घसरण थांबेल की अशीच सुरू राहील काय?

पक्षवाढीची ताकद विचारांच्या आधारे नेता कार्यकर्त्यांना किती कामाला लावू शकतो यावर अवलंबून असतं किंवा अलिकडेचा दुसरा निकष आर्थिक ताकदीचा. विचारांच्या पातळीवर हिंदुत्व सांगणाऱ्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गटाच्या उमदेवारांच्या मंडपात मुस्लिम धर्मीय तरुणांची गर्दी वाढत जाताना दिसत होती. याच काळात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन बहरात होते. या आंदोलनातून निर्माण झालेली ‘मराठा-दलित-मुस्लिम’ अशी मतपेढी शिवसेनेच्या ठाकरे गटास काही मतदारसंघात यश मिळवून देणारी ठरली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव, परभणी आणि हिंगोलीमध्ये यश मिळालं. या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे खासदार आता शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आहेत. हाती लागलेली मतपेढी आता खिळखिळी झाली आहे.

शिवसेनेच्या आमदार खासदार फुटीनंतर अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव आणि ओम राजेनिंबाळकर हे ठाकरेंसोबत राहिले. फुटीमध्ये मराठवाड्यातील तेव्हाची आमदारांची संख्या नऊ होती. तेव्हा मराठवाड्यातील उदयसिंह राजपूत, कैलास पाटील, आणि डॉ. राहुल पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात थांबले. यातील उदयसिंह राजपूत हे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले. तेव्हा शिवसेनेचे नेते निधी न मिळाल्याचे खापर राष्ट्रवादीच्या नेत्यावर फोडत होते. परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी तर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्याबरोबर खुर्चीला खुर्ची लावून बसण्याची लाज वाटते, या भाषेत टीका केली होती.

Video : ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

‘गद्दार’, ‘खुद्दार’ या शब्दांची राजकीय पटलावर रेलचेल होती. तेव्हाही बंडखोर आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी खास दौरा करून टीका केली. पण पुढे या मतदारसंघात शिवसेनेतून फुटणाऱ्या नेत्यांना मतदारांनी स्वीकारले. अशी समूह मानसिकता घडून यावी म्हणून आणलेल्या लाभ देणाऱ्या योजनांचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला.

विधानसभे ठाकरे यांचे २० आमदार निवडून आले. त्यात मराठवाड्यातील संख्या फक्त ३. बाकी ताकद मुंबईत. पुढे महापालिकांमध्ये घसरण सुरूच राहिली. छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात नगसेवकांची संख्या अगदी सहापर्यंत घसरली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये मराठवाड्यात निवडून आलेले सदस्य आहेत १२१ आणि तुलनेने शिंदे गटातील संख्या आहे २६२. हे सारे घडण्यामागे मतदानाच्या वेळी लागणारी आर्थिक रसद हे मुख्य कारण असल्याचा दावा करत मग पक्षीय फूट कशी नैतिक, हे सांगणे सुरू झालं.

शिवसेना ६० वर्षांची होत असताना शिवसेनेतील नेत्यांची भाषणे ऐकणाऱ्यांचे वयही वाढत गेले. आता उद्धव ठाकरे यांची भाषणं ऐकण्यासाठी येणारा वर्ग हा ४० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या ठाकरे गटाने अलिकडच्या काळात केलेल्या आंदोलनाचा सरासरी वेळ दोन तासांपेक्षा अधिक नसतो. काही घोषणा, एक निवेदन, त्यावर काही मोजक्या सह्या आणि नंतर महत्त्वाचे काम म्हणजे ‘बाईट’ देणं. एकदा माध्यमांशी बोलून झाले की, आंदोलनकर्ते निघून जातात. कांद्याचे पडलेले भाव, कर्जमुक्तीतील गोंधळ हे ठाकरे गटाने अलिकडच्या काळात हाताळलेले प्रश्न. पण ही आंदोलने तड लागेपर्यंत गेली नाहीत.

अलीकडेच ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार उघडकीस आला. पण घोटाळ्याचे मूळ ज्या लातूरमध्ये आहे तिथे अद्याप एकही आंदोलन झालेले नाही. दुसरीकडे, मराठवाड्यातील कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या आंदोलनास मात्र वेगवेगळ्या शहरांत प्रतिसाद मिळतो. याचा अर्थ एवढाच की तरुणांचे प्रश्न हाताळणारी शिवसेना आता ६० वर्षांची झाली आहे. या काळात ज्या शहरात शिवसेना वाढली अशा शहरातील काही डॉक्टर, वकील, वास्तुविषारद, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक या क्षेत्रातील यशस्वी मंडळी शिवसेनेला जोडता आली का, असाही प्रश्न विचारायला हवा. अशा मंडळींची वर्षभरातून एखादी बैठक घ्यावी, अशी प्रक्रियाही या पक्षात सुरू असल्याचे दिसत नाही.

सत्तेत असताना उद्योगमंत्री असताना सुभाष देसाई यांनी अशी एक बैठक घेतली होती. पण पुढे त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही. त्यात कधीही सातत्य नव्हते. परिणामी शिवसेनेच्या हक्काची विरोधी पक्षाची पोकळी कॉक्रोच जनता पार्टी भरून काढू शकेल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. राजकीय पक्षासाठी आवश्यक असणारा कार्यक्रम देण्यात शिवसेना कमी पडली आणि मराठवाड्यातील तरुण जातीच्या आंदोलनात ओढले गेले. दुसरीकडे, कधीकाळी लोकांचे प्रश्न, त्यावर आंदोलने करणारा पक्षही हरवला आहे. या साऱ्याचा परिणामस्वरूप शिवसेनेच्या ठाकरे गटाची घसरण हळूहळू सुरू झाली. आज तर विरोधी पक्ष म्हणून ठाकरे गटाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

follow us