मतदारांशी माझं जिव्हाळ्याचं नातं; विकासकामांच्या जोरावर निवृत्ती बांदल यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
उंड्री गावचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते असलेले निवृत्ती आण्णा बांदल हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात.
Nivrutti Bandal expressed confidence of victory : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 41 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती आण्णा बांदल यांच्याशी खास संवाद साधण्यात आला. मोहम्मदवाडी-उंड्री हा परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे निवडणूक होत असून, त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उंड्री गावाचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते असलेले निवृत्ती आण्णा बांदल हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच अशी विविध पदं भूषवलेल्या बांदल यांनी गेली 25 वर्षे सक्रिय राजकारणात काम केलं आहे. विशेष म्हणजे, इतक्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर ते पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना निवृत्ती बांदल म्हणाले की, उंड्री गाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असताना आम्ही सुमारे पाच कोटी रुपयांची विकासकामे करून दाखवले. रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे आज उंड्री भागातील विकास इतर भागांच्या तुलनेत अधिक चांगला असून, त्याचा मला अभिमान आहे. ग्रामपंचायतीत जसा विकास केला, तसाच विकास महापालिकेतही करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभागातील समस्यांवर बोलताना त्यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष वेधलं. “आम्ही जिथे जातो, तिथे नागरिक थेट विचारतात, आम्हाला पाणी नाही, तुम्ही काय करता?” असं सांगत निवडून आल्यास सर्वात आधी पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. उंड्री गावात मागेल त्याला बोरिंग, पाण्याची व्यवस्था, बेंचेस आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपट्टी भरण्याचं काम केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. वनाजवाडी ते कार्पोरेशन लाईनपर्यंतचा मार्ग तयार करून उंड्रीपर्यंत पाणी आणण्याचं कामही आम्हीच केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आज होणार घोषणा? राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात
यावेळी त्यांनी विद्यमान परिस्थितीवर टीकाही केली. 2011 मध्ये प्रस्तावित असलेला 100 मीटर डीपी रस्ता आजतागायत पूर्ण झालेला नसल्याचं सांगत, हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं. गेली 8 ते 9 वर्षे महापालिका निवडणुका न झाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रभागातील “खडा ना खडा” माहिती असलेला उमेदवार अशी ओळख असल्याचं सांगत त्यांनी विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
निवडून आल्यास पुढील योजनांविषयी बोलताना निवृत्ती बांदल म्हणाले की, क्रीडांगण, सरकारी दवाखाना, उद्यान अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. या परिसरात ससून रुग्णालयासारखं मोठं रुग्णालय व्हावं, ही माझी इच्छा आहे. तसेच प्रलंबित डीपी रोड आणि अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिकेत गेल्यानंतर पहिल्याच सभागृहात पाण्यासाठी “भांडून का होईना, पण पाणी घेऊन येईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर पाण्यासाठी वाढणाऱ्या मेंटेनन्सचा ताण कमी करणं हेही आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना काळातील कामाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, त्या कठीण काळातही अनेक लोकहिताची आणि विकासाची कामं केली. सरकार, आमदार आणि स्वतःच्या खर्चातून दररोज सुमारे 500 लोकांना जेवण देण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं. “जे जे माझ्याकडून शक्य होतं, ते सगळं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे,” असं ते म्हणाले.
विधानसभेतील ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्याचा भाजपलाच विसर; अकोटमध्ये ओवैसींच्या एमआयएमशी युती
राजकारणात येण्यामागची भूमिका स्पष्ट करताना निवृत्ती बांदल यांनी सांगितलं की, दिवंगत विठ्ठलराव तुपे यांच्या प्रचारातून समाजसेवेची गोडी लागली. कोणतंही पद नसताना लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजकार्य केलं आणि त्यातूनच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. समोरचा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो, त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे. सायकलवर फिरून समाजकाम केल्यापासून ते मुंबईत एका रुपयाच्या दिवसावर काम करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.
राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या नात्याबाबत ते म्हणाले की, लहानपणापासूनच माझी नाळ राष्ट्रवादीशी जोडलेली आहे. मतदारांशी माझं जिव्हाळ्याचं नातं असून, विकासकामांच्या जोरावर विजयाचा मला पूर्ण विश्वास आहे. शेवटी मतदारांना आवाहन करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “आम्ही काम केलं नसेल तर आम्हालाही मतदान करू नका. विकासाला मतदान करा.”
