नगरमध्ये मोठा उलटफेर; निलेश लंकेंनी चारली सुजय विखेंना धूळ
Ahmednagar Lok Sabha Election Results 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर तुतारी वाजली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यापेक्षा जवळपास 31 हजार मतांची आघाडी घेतली. या मतदारसंघात चांगलीच चुरस रंगली होती. अनेक फेऱ्यात विखे आणि लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली पण अखेर नीलेश लंके यांनी विजयी झाले. आता फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी राहिली आहे. विद्यमान खासदार सुजय विखेंचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिर्डी मतदारसंघाप्रमाणेच नगर दक्षिण मतदारसंघही महायुतीने गमावला आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व अधोरेखित झालं आहे. दरम्यान, मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या असून आता फक्त एक फेरी राहिली आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 64.79 टक्के मतदान झालं होतं. यंदा 66.61 टक्के मतदान झाले. म्हणजेच यंदा मतदानात 1.82 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. पारनेर मतदारसंघात 70.13 टक्के, राहुरीत 70 टक्के, श्रीगोंद्यात 67.90 टक्के, कर्जत-जामखेडमध्ये 66.19 टक्के, शेवगावात 63.03 टक्के आणि नगर शहर मतदारसंघात 62.50 टक्के इतके मतदान झाले आहे.
Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !
यानंतर आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंना 18 हजार 444 तर निलेश लंके यांना 18 हजार 224 मते मिळाली. पहिल्या फेरीत सुजय विखेंना फक्त 190 मतांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मात्र चित्र पालटले. नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी 851 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा सुजय विखेंनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीत सुजय विखेंना 27 हजार 466 तर निलेश लंकेंना 24 हजार 997 मते मिळाली.
पक्षीय बलाबलाचा विचार केला तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार, भाजप 2 आणि विधानपरिषदेवर भाजपचा एक असे आमदार आहेत. येथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पारनेरमध्ये निलेश लंके, राहुरीत प्राजक्त तनपुरे, श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, कर्जत-जामखेडात रोहित पवार, शेवगाव-पाथर्डीत भाजपाच्या मोनिका राजळे आणि नगर शहरात अजित पवार गटाचे संग्राम जगताप आमदार आहेत.
2019 च्या निवडणुकीत सुजय विखे यांना 7,04,660 मते मिळाली होती तर संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली होती. या निवडणुकीत सुजय विखे तब्बल 2,81,526 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. परंतु, या निवडणुकीत मात्र महायुतीचे सगळेच डाव उलटे पडले. या मतदारसंघात सुजय विखे यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. तरीदेखील सुजय विखेंना निलेश लंके भारी ठरले आहेत.
नगरमध्ये सुजय विखे-निलेश लंकेंमध्ये कांटे की टक्कर; विखेंची 9863 मतांची आघाडी